चंद्रदर्शन घडल्याने आज रमजान ईद; सर्वत्र उत्साह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2018 12:18 AM2018-06-16T00:18:41+5:302018-06-16T00:18:41+5:30
मुस्लीम बांधवांच्या पवित्र रमजान पर्वाची चंद्रदर्शन घडल्याने शुक्रवारी (दि. १५) संध्याकाळी सांगता झाली. शनिवारी (दि. १६) शहरासह जिल्हाभरात सर्वत्र ईद-उल-फित्र अर्थात रमजान ईद साजरी केली जाणार आहे. शहरातील शहाजहॉँनी ईदगाह मैदानावर सकाळी १० वाजता पारंपरिक पद्धतीने सामूहिक नमाजपठणाचा सोहळा पार पडणार आहे.
नाशिक : मुस्लीम बांधवांच्या पवित्र रमजान पर्वाची चंद्रदर्शन घडल्याने शुक्रवारी (दि. १५) संध्याकाळी सांगता झाली. शनिवारी (दि. १६) शहरासह जिल्हाभरात सर्वत्र ईद-उल-फित्र अर्थात रमजान ईद साजरी केली जाणार आहे. शहरातील शहाजहॉँनी ईदगाह मैदानावर सकाळी १० वाजता पारंपरिक पद्धतीने सामूहिक नमाजपठणाचा सोहळा पार पडणार आहे. शुक्रवारी कुठल्याही प्रकारचे ढगाळ हवामान नसल्यामुळे शहरासह उपनगरांमध्ये संध्याकाळी स्पष्ट चंद्रकोर बांधवांना बघता आली. याबरोबरच रमजान पर्वाची सांगता होऊन पुढील उर्दू महिना शव्वालची १ तारीख मोजली गेली. शहर-ए-खतीब हिसामुद्दीन अशरफी यांनी तत्काळ शाही मशिदीमधून चंद्रदर्शन घडल्याने शनिवारी ईद साजरी करण्याची घोषणा केली. चंद्रदर्शन घडल्यामुळे ईद साजरी करण्याविषयीचा संभ्रम दूर झाला. रमजान पर्वाचा प्रारंभ आणि सांगता शुक्रवारीच झाली. बहुतांश मुस्लीम बांधवांनी महिनाभर निर्जळी उपवास करत अल्लाहची उपासना केली.
‘चांद मुबारक’च्या शुभेच्छा
शुक्रवारी संध्याकाळी समाजबांधवांनी एकमेकांना ‘चांद मुबारक’ अशा शुभेच्छा दिल्या. दरम्यान, संध्याकाळी जुने नाशिक परिसरातील चौक मंडई, शहीद अब्दुल हमीद चौक, भद्रकाली, मेनरोड, रविवार कारंजा आदी परिसरातील बाजारपेठेत मोठी गर्दी उसळली होती. रात्री उशिरापर्यंत नागरिकांची गर्दी कायम होती. या परिसरात पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला होता. खरेदीसाठी मोठ्या संख्येने नागरिक बाहेर पडल्याने बाजार फुलला होता. सुकामेवा, नवीन कपडे, पादत्राणे, मेहंदी, अत्तर, टोपी, सुरमा आदींना मागणी वाढली होती.
ईदगाह सज्ज
नमाजपठणाच्या सोहळ्यासाठी ईदगाह मैदान सज्ज करण्यात आले होते. शुक्रवारी संध्याकाळी चंद्रदर्शन घडताच ईदगाहचे दोन्ही प्रवेशद्वार पोलिसांकडून बंद करण्यात आले होते. मैदानाचा ताबा पोलिसांकडून घेण्यात आला होता. मैदानाचे सपाटीकरण करून दोन्ही बाजूला पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.