...तर रविवारी रमजानचा पहिला ‘रोजा’
By admin | Published: May 23, 2017 04:47 PM2017-05-23T16:47:46+5:302017-05-23T17:12:37+5:30
रमजान पर्वाचे शनिवारी (दि.२७) चंद्रदर्शन घडल्यास येत्या रविवारपासून रमजानच्या उपवासांना प्रारंभ
नाशिक : निर्जळी उपवासांचा (रोजा) महिना म्हणून सर्वत्र ओळखल्या जाणाऱ्या रमजान पर्वाचे शनिवारी (दि.२७) चंद्रदर्शन घडल्यास येत्या रविवारपासून रमजानच्या उपवासांना प्रारंभ होणार आहे. इस्लामी कालगणनेचा नववा उर्दू महिना रमजानुल मुबारक आहे. या महिन्यात मुस्लीमबांधव सुमारे पंधरा तासांचा निर्जळी उपवास महिनाभर ठेवतात. पहाटे सूर्योदयापूर्वीच अल्पोपहाराचा विधी (सहेरी) करून उपवासाला प्रारंभ केला जातो. संध्याकाळी सूर्यास्तानंतर वेळापत्रकामध्ये नमूद करण्यात आलेल्या वेळेनुसार फलहार करून उपवास (इफ्तार) सोडला जातो. हा नित्यक्रम संपूर्ण महिनाभर सुरू असतो. रमजानपर्वामध्ये मुस्लीम बांधवांची दिनचर्या पूर्णपणे बदललेली पहावयास मिळते. पहाटे उठण्यापासून धार्मिक कार्यांना सुरुवात होते. धर्मग्रंथ कुराणचे पठण, पाचवेळा काटेकोरपणे नमाजपठणाचे पालन तसेच रात्री ‘तरावीह’च्या विशेष नमाजचे पठण करण्यावर नागरिक या कालावधीत भर देतात. त्याचप्रमाणे या महिन्यात दानधर्मालाही विशेष प्राधान्य दिले जाते. आत्मशुद्धीचे पर्व म्हणून रमजान महिन्याकडे बघितले जाते.
बहुसंख्य मुस्लीम नागरिकांनी रमजानपर्वच्या उपवासांचे वेळापत्रक छापले असून, मशिदींमधून वाटप करण्यावर भर दिला जात आहे. त्याचबरोबर रमजान कालावधीत मशिदींमध्ये नमाजपठणाकरिता होणारी गर्दी लक्षात घेता शहरातील सर्व मशिदींमध्ये तयारीला वेग आला आहे. मशिदींमधील विद्युत, पाणी, बैठक व्यवस्थेची तपासणी केली जात आहे. नादुरुस्त दिवे, नळांची दुरुस्तीलाही सुरुवात करण्यात आली आहे, जेणेकरून नागरिकांची कुठलीही गैरसोय होणार नाही, याची काळजी घेतली जात आहे.