रामचंद्र जाधव : जानेवारीत बांधकामास प्रारंभ शिक्षण मंडळाला हक्काची इमारत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2017 11:53 PM2017-12-12T23:53:14+5:302017-12-13T00:21:39+5:30
माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या नाशिक येथील कार्यालयाला हक्काची इमारत मिळणार आहे. जानेवारीपासून आडगाव येथे बांधकामाला सुरुवात होणार आहे.
सिन्नर : माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या नाशिक येथील कार्यालयाला हक्काची इमारत मिळणार आहे. जानेवारीपासून आडगाव येथे बांधकामाला सुरुवात होणार आहे. लोकप्रतिनिधींच्या सुमारे ५० कोटी रुपयांच्या निधीतून ही इमारत उभारण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव यांनी शिक्षक संघटनेच्या पदाधिकाºयांसोबत चर्चा करताना दिली.
आमदार बाळासाहेब सानप यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस सचिव आर. आर. मारवाडी, सहसचिव मच्छिंद्र कदम, सहायक सचिव वाय. पी. निकम, लेखाधिकारी श्वेता भोसले, एन. आर. देशमुख, ए. डी. बागुल, कैलास सांगळे, मुख्याध्यापक संघाचे सचिव एस. बी. देशमुख, माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष मोहन चकोर, दत्ता वाघे पाटील आदी उपस्थित होते. विभागीय शिक्षण मंडळाचे कार्यालय द्वारका भागातील वाणी हाउस येथील भाडेतत्त्वावरील इमारतीत कार्यरत आहे. भाड्यापोटी दरमहा चार लाख साठ हजार रुपये खर्च मंडळाला येतो. तत्कालीन सचिव एस. एस. म्हस्के यांनी आडगाव येथे यापूर्वीच सात एकर जागा घेतली आहे. सध्या त्यावरील अतिक्रमणाने बांधकाम प्रलंबित आहे. डिसेंबर अखेरपर्यंत अतिक्र मण काढून जानेवारी महिन्यात बांधकाम सुरू करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. त्यासाठी मंडळाकडे २३ कोटी रुपये असल्याचे जाधव यांनी सांगितले. पार्किंग, बैठकव्यवस्था, पेपर सेटिंग हॉल, मुख्याध्यापकांसाठी वेटिंग हॉल, मूल्यांकन कस्टडी हॉलसह इतर सुविधाही यात असणार आहे. विभागीय शिक्षण मंडळाच्या इमारतीबाबत शिक्षक प्रतिनिधींशी चर्चा करण्यात आली. त्या प्रसंगी आमदार बाळासाहेब सानप यांनी सहकार्याचे आश्वासन दिले.