गळा चिरलेल्या वृद्धाच्या मदतीला धावले रामदंडी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 04:38 AM2021-02-20T04:38:25+5:302021-02-20T04:38:25+5:30

नाशिक : बुधवारची सायंकाळची पाच-साडेपाचची वेळ. एक अनोळखी वृद्ध गळ्यावर वार झाल्याने रक्ताच्या थारोळ्यात पडून मदतीच्या अपेक्षेने याचना ...

Ramdandi rushed to the aid of an old man with a slit throat | गळा चिरलेल्या वृद्धाच्या मदतीला धावले रामदंडी !

गळा चिरलेल्या वृद्धाच्या मदतीला धावले रामदंडी !

Next

नाशिक : बुधवारची सायंकाळची पाच-साडेपाचची वेळ. एक अनोळखी वृद्ध गळ्यावर वार झाल्याने रक्ताच्या थारोळ्यात पडून मदतीच्या अपेक्षेने याचना करीत होता. मात्र, काही जण त्या रस्त्यावरुन निघून जात होते, तर काही नाशिककर बघे बनले आणि काही जण तर मोबाईलवर शुटींग घेत उभे होते... पण कुणीही पुढाकार घेत नसताना त्या रस्त्यावरुन जाणाऱ्या भोसला महाविद्यालयाच्या ६ रामदंडींनी (विद्यार्थी) तत्परतेने त्या आजोबांकडे धाव घेऊन त्यांना नजीकच्या गुरुजी रुग्णालयात दाखल करण्याचे धैर्य दाखवले. या विद्यार्थ्यांनी दाखवलेल्या धारीष्ट्यामुळे त्या वृद्धावरील उपचारांना प्रारंभदेखील झाला.मात्र गळ्यावरील वाराने खूप रक्तस्त्राव झाल्याने त्या वृद्धाचा मृत्यु झाला असला तरी विद्यार्थ्यांनी त्यांच्या आचरणातून समाजापुढे आदर्श प्रस्थापित करीत बघे आणि शुटींग करणाऱ्यांना एकप्रकारे चपराक लगावली.

बुधवारी सायंकाळी भोसला कॉलेजमध्ये सुरु असलेली एनसीसीची परिक्ष आटोपून काही विद्यार्थी घरी जात होते. त्यांना रस्त्याच्या कडेला पडलेल्या जखमी व्यक्तीभोवती असलेली गर्दी नेमकी कसली ते कळले नाही. ते पुढे सरकल्यावर त्यांनी पाहिले तर एक वृद्ध गळ्यावर वार झाल्याने रक्ताच्या थारोळ्यात पडले होते, त्याचवेळेस काहीजण त्यांचे मोबाईलमध्ये चित्रीकरण करत होते तर काहीजण बघ्याच्या भूमिकेत होते. मात्र, पोलिस कारवाई होईल, आपल्याला घेऊन जातील, चौकशी करतील यासारख्या बाबींची चिंता न करता हे विद्यार्थी त्या वृद्धाला तिथून रुग्णालयात नेण्याच्या तयारीत होते. अखेर तिथे आलेल्या एका पोलिसाच्या मदतीने त्या व्यक्तीला रिक्षात घातले आणि जवळच असलेल्या श्री गुरुजी रूग्णालयात नेले, रूग्णालयातही वेगाने उपचार करण्यासाठी पाठपुरावा केला. त्यानंतर त्यांनी भोसला महाविद्यालयाचे मेजर विक्रांत कावळे आणि प्राचार्य डॉ.उन्मेष कुलकर्णी यांना झालेल्या प्रकारांची माहिती दिली. गंगापूर पोलिस ठाण्यातील पोलीस निरीक्षकांनीदेखील विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

चौकट

रामदंडींचा संस्थेतर्फे गौरव

भोसला महाविद्यालयातील ज्या विद्यार्थ्यांनी समयसूचकता दाखवली ते एनसीसीचे कॅडेट केतन देवरे,रोहन खोडे,शुभम सिंग,अनिकेत बारसे,सोमेश सिन्हा,धिरज भावसार यांना संस्थेच्या नाशिक विभागाचे कार्यवाह हेमंत देशपांडे यांनी गौरवाचे प्रतिक असलेला कॅडेट बॅच त्यांच्या छातीवर लावत अभिनंदन केले. तसेच आपण सारेजण भोसलांचे रामदंडी असल्याबद्दल संस्थेला आपला अभिमान असल्याचे सांगितले. यावेळी प्राचार्य डॉ.उन्मेष कुलकर्णी, वाणिज्य विभागाचे प्रमुख प्रा.डॉ.सुनिल जोशी, योगेश भदाणे उपस्थित होते.

फोटोओळ- १८भोसला

गंगापूर रस्त्याच्या बाजूला पडलेल्या अनोळखी जखमी व्यक्तीला मदत करणाऱ्या भोसला महाविद्यालयातील एनसीसी रामदंडींचा संस्थेच्या नाशिक विभागाचे कार्यवाह हेमंत देशपांडे यांच्या हस्ते सत्कार झाला.. त्यावेळी प्राचार्य डॉ.उन्मेष कुलकर्णी,योगेश भदाणे आदी.

Web Title: Ramdandi rushed to the aid of an old man with a slit throat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.