नाशकात रेमडेसिविरचा काळाबाजार सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 01:29 AM2021-05-15T01:29:47+5:302021-05-15T01:30:16+5:30
कोरोना संकटाचा गैरफायदा घेत बाधित रुग्णांसाठी आवश्यक रेमडेसिविर इंजेक्शनची काळ्याबाजारात तब्बल ५४ हजार रुपये ज्यादा दराने विक्री करणाऱ्या तीन परिचारिकांसह एका औषधांच्या दुकानातील कर्मचाऱ्यास पोलिसांनी गुरुवारी (दि.१३) रात्री अटक केली आहे. या चौघांनाही न्यायालयाने चार दिवसासाठी पोलीस कोठडीत रवानगी केली आहे.
नाशिक : कोरोना संकटाचा गैरफायदा घेत बाधित रुग्णांसाठी आवश्यक रेमडेसिविर इंजेक्शनची काळ्याबाजारात तब्बल ५४ हजार रुपये ज्यादा दराने विक्री करणाऱ्या तीन परिचारिकांसह एका औषधांच्या दुकानातील कर्मचाऱ्यास पोलिसांनी गुरुवारी (दि.१३) रात्री अटक केली आहे. या चौघांनाही न्यायालयाने चार दिवसासाठी पोलीस कोठडीत रवानगी केली आहे.
अन्न व औषध प्रशासन विभागासह पोलिसांनी आडगाव शिवारात ही कारवाई केली. एका हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या परिचारिकेसह सिडकोतील मेडिकल दुकानात काम करणारा युवक अन्य संशयितांच्या मध्यस्थीने रेमडेसिविर इंजेक्शनची काळ्या बाजारात विक्री करीत असताना ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी कर्मवीर काकासाहेब वाघ महाविद्यालयासमोर सापळा रचत संशयित जागृती शरद शार्दुल (२१), श्रुती रत्नाकर उबाळे (२१) या दोघींना इंजेक्शनची विक्री करताना रंगेहाथ पकडले. त्यांना स्नेहल अनिल पगारे (२२, रा. शांतीनगर मनमाड ) व कामेश रविंद्र बच्छाव (२२, उदय कॉलनी , नाशिक ) हे इंजेक्शन उपलब्ध करून देत असल्याची माहिती समोर आल्यानंतर पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक इरफान शेख, अन्न व औषध प्रशासन विभागाचे निरीक्षक सुरेश देशमुख यांच्या पथकाने ही कारवाई केली.
संशयितांना
पोलीस कोठडी
n पोलिसांनी केलेल्या कारवाईत संशयितांकडून दोन रेमडेसिविर इंजेक्शन, मोबाईल, स्कूटी असा एकूण ४७ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. दरम्यान, अटक केलेल्या चौघाही संशयितांना पोलिसांनी शुक्रवारी न्यायालयात हजर केले. यावेळी न्यायालयाने चौघांनाही सोमवारपर्यंत (दि.१७) पोलीस कोठडी सुनावल्याची मोाहिती पोलिसांनी दिली.