रामकुंडावर स्नानासाठी भाविकांचा ओघ सुरूच
By Admin | Published: September 26, 2015 11:05 PM2015-09-26T23:05:09+5:302015-09-26T23:07:13+5:30
साधली पर्वणी : मंदिरांमध्येही झाली गर्दी
नाशिक : त्र्यंबकला शुक्रवारी तिसऱ्या शाहीस्नानंतर शनिवारी रामकुंडावर स्नानासाठी भाविकांचा ओघ कायम दिसून आला. परराज्यातून त्र्यंबकला शाहीस्नानासाठी आलेल्या भाविकांनी रामकुंडावर स्नानासाठी गर्दी केली होती.
त्र्यंबकच्या कुशावर्त तीर्थावर स्नान केल्यानंतर भाविकांनी रामकुंडावर स्नान करून परतीचा मार्ग धरला. रामकुंड परिसरात परराज्यातील भाविकांनी परिसरातील काळाराम मंदिर, कपालेश्वर मंदिर याठिकाणी दर्शनासाठी भाविक मोठ्या संख्येने दिसून आले.
त्र्यंबककडून परतणाऱ्या भाविकांना रामकुंडात स्नानाला प्राधान्य दिल्याने दोन दिवसांपासून रामकुंडावर भाविकांचा स्नान करण्याकडे कल वाढला आहे. रामकुंडापर्यंत वाहने जात असल्याने परराज्यातून येणाऱ्या भाविकांना निवांतपणे स्नान करता येत आहे. त्यामुळे विविध राज्यांतून येणाऱ्या भाविकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. रामकुंड परिसरात पोलिसांनी बंदोबस्त कायम ठेवला आहे.
नाशिकला तिसरी शाही पर्वणी १८ सप्टेंबरला पार पडली. पाऊस व पर्वणीच्या कालावधीत येऊ न शकलेले भाविक सध्या स्नानाचा लाभ घेत आहे. त्र्यंबकच्या शाही पर्वणीनंतर भाविक शहरात दाखल होत आहेत. शहरात मेळा स्थानकात दाखल झाल्यानंतर भाविक रामकुंडाकडे प्रस्थान करत आहेत. त्यामुळे मेळा स्थानकावरून त्र्यंबकवरून परतणारे भाविक रिक्षा, शहर सेवेतील बसेसद्वारे गंगाघाटावर येत आहेत. दिवसभर भाविकांची रामघाटावर रेलचेल पहायला मिळाली. दरम्यान, सीतागुंफा पाहण्यासाठीही सकाळपासूनच रांगा लागल्या होत्या. तसेच तपोवनाकडे जाणाऱ्या रस्त्यावर भाविकांची दिवसभर वर्दळ सुरू होती. त्यामुळे या रस्त्यावर काही प्रमाणात ट्राफिक जॅमचा प्रत्यय नाशिककरांना
आला. (प्रतिनिधी)