रामनगर गावामध्ये वरात, मानपानासह दारूबंदीचा एकमुखी ठराव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2019 07:10 PM2019-06-09T19:10:24+5:302019-06-09T19:10:47+5:30
रामनगर : गेल्या अनेक वर्षांपासून चालत आलेल्या अनिष्ट प्रथा बंद करण्याचा निर्णय निफाड तालुक्यातील रामनगर गावाने घेऊन समाजापुढे एक नवा आदर्श उभा केला आहे. गावामध्ये यापुढे लग्नाची वरात , नवरदेव मिरवणूक व दारूबंदी करण्यात आली आहे. लग्नाची मिरवणूक डीजे व बॅण्डशिवाय काढण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे. गावात याची सुरुवात म्हाळू शिंदे यांचा मुलगा गणेश याची नवरदेव मिरवणूक कोणत्याही वाद्याशिवाय काढण्यात आली.
सरपंच सविता थेटे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच रामनगरची ग्रामसभा पार पडली. गावातील ज्येष्ठ, युवकांनी एकत्र येत ग्रामसभा बोलावली होती. गावातील ग्रामस्थांनी मोठा प्रतिसाद दिला. यावेळी गावच्या हिताचा विचार करून समाजाला दिशा देणारे आगळे वेगळे महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.
गावाच्या व गावकऱ्यांच्या भल्याचे निर्णय कसे फायद्याचे आहे हे गावकऱ्यांना पटवून सांगण्यात आले. रामनगरमध्ये दारूबंदीचा ठराव एकमुखाने संमत करण्यात आला. निर्णयास विरोध करेल त्या कुटुंबाच्या कोणत्याही कार्यक्र माला गावकरी जाणार नाही, असे यावेळी सांगण्यात आले. दारूबंदीसाठी समिती नेमण्यात आली आहे तसेच पोलीस ठाण्यात याबाबत पत्र देण्यात येणार असल्याचे उपसरपंच अंबादास जामकर यांनी सांगितले. यावेळी सर्व ग्रामपंचायत सदस्य, विविध कार्यकारी सोसायटीचे सदस्य, गावातील तरु ण, ज्येष्ठ, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.