मालेगावसह परिसरात रामनामाचा जयघोष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2018 12:10 AM2018-03-26T00:10:18+5:302018-03-26T00:10:18+5:30
‘श्रीराम, जय राम, जय जय राम’ नामाचा गजरात राम जन्मोत्सव साजरा करण्यात आला. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. संगमेश्वर परिसरात दोन राम मंदिरे आहेत. सावता चौकातील राम मंदिरात पहाटेपासूनच भाविकांची दर्शनासाठी गर्दी झाली होती.
संगमेश्वर : ‘श्रीराम, जय राम, जय जय राम’ नामाचा गजरात राम जन्मोत्सव साजरा करण्यात आला. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. संगमेश्वर परिसरात दोन राम मंदिरे आहेत. सावता चौकातील राम मंदिरात पहाटेपासूनच भाविकांची दर्शनासाठी गर्दी झाली होती. दुपारी १२ वाजता भजन, भक्तिगीतांनी राम जन्मोत्सव साजरा करण्यात आला. परिसरातील आबालवृद्ध भाविकांची रांगा लावून दर्शन घेतले. भाविकांनी पुष्पहार अर्पण करून राम-सीतेच्या मूर्तींची मनोभावे पूजा केली. भाविकांनी रामनामाचा गजर केला. मंदिराच्या वतीने भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले. मंगलमय वातावरणात भाविकांनी महाआरती केली. मंदिर परिसरात रोषणाई करण्यात आली आहे. फुलाच्या माळांनी मंदिराची सजावट करण्यात आली होती. रात्री उशिरापर्यंत भाविकांची दर्शनासाठी गर्दी केली होती. सावता महाराज मंदिराचे विश्वस्त, भाविक, नागरिकांची उपस्थिती होती. रामसेतूनजीकच्या राम मंदिरात राम जन्मोत्सव साजरा झाला. रामनवमीनिमित्त गुढीपाडव्यापासून श्रीराम कथेचे आयोजन करण्यात आले होते. सप्ताह काळात अखिलेश महाराज यांनी रोज दुपारी ३ ते ६ यावेळेत श्रीराम कथा सादर केली. कार्यक्रमाला भाविकांची उपस्थिती चांगली होती. राष्टÑीय एकात्मता समितीच्या वतीने राम जन्मोत्सवानिमित्त मूर्तीस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून नागरिकांना शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते. मनमाड चौफुलीनजीक नव्याने उभारण्यात येत असलेल्या श्रीराम मंदिरात रामप्रतिमेचे पूजन करण्यात आले. पूजा, अभिषेक, आरती करण्यात येऊन प्रसाद वाटप करण्यात आला. नगरसेवक राजाराम जाधव, संजय जाधव, किशोर जाधव, राजेंद्र चौधरी आदींसह कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. संगमेश्वरातील नवीन होळी चौकातील त्रिशूळ मंडळाच्या वतीने इच्छामणी गणेश मंदिर परिसरात राम जन्मोत्सव साजरा करण्यात आला. संजय कैचे, सदानंद सूर्यवंशी, नाना देवरे, पंकज अमृतकर, अतुल कैचे आदींसह भाविकांची मोठी उपस्थिती होती.
परशरामनगरात प्रवचनासह आरती
कलेक्टरपट्टा : येथील परशरामनगर येथील विठ्ठल-रखुमाई मंदिरात श्रीराम नवमी साजरी करण्यात आली. भाविकांनी मंदिराची सजावट करुन श्रीराम जन्मोत्सवानिमित्त भजन, आरती केली. यानिमित्त हरिदास महाराज यांचे प्रवचनाचे आयोजन करण्यात आले होते. प्रसादाचा भाविकांनी लाभ घेतला. यावेळी केदा महाराज, जगन्नाथ महाराज, बाळासाहेब सैंदाणे, वामन महाराज बच्छाव, उत्तम चव्हाण, काशीनाथ महाराज, विक्रम गढरी, बापू बच्छाव, सुमनबाई बच्छाव, शशिकला पवार, मंजुळा आहिरे, पुष्पा सैंदाणे, हिराबाई केदार, सुरेश पवार, दगा बच्छाव, बाळू देसाई, अंबादास चौधरी, निर्मला बच्छाव, निर्मला सावकार आदी उपस्थित होते. अभिषेक करून हनुमानाचे पूजन
वाके : येथील ज्ञानेश्वर भजनी मंडळ व ग्रामस्थांच्या वतीने श्रीराम नवमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. पहाटे श्रीराम मंदिरात मूर्तींना अभिषेक करुन हनुमानचे विधिवत पूजन करण्यात आले. सकाळपासूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. संत ज्ञानेश्वर भजनी मंडळाच्या वतीने हनुमान मंदिरात भजनाचा कार्यक्रम झाला. टाळ-मृदंगाच्या गजरात रामायणातील विविध प्रसंगांचे वर्णन करण्यात आले. ग्रामस्थांच्या वतीने राम जन्मोत्सवानिमित्त पाळणा पुष्पांनी सजवण्यात आला होता. या पाळण्यात रामाची मूर्ती ठेवण्यात आली होती. दुपारी १२ वाजता पाळण्याला झोका देऊन राम जन्मोत्सव साजरा करण्यात आला. यांनतर प्रसादाचे वाटप करण्यात आले.