वैतरणा प्रकल्पाच्या प्रवेशद्वारावर कोसळली दरड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2019 01:18 PM2019-07-11T13:18:01+5:302019-07-11T13:18:22+5:30
घोटी : जोरदार पावसामुळे मुंबईला वीजपुरवठा करणाऱ्या वैतरणा जलविद्युत प्रकल्पाच्या मुख्य दरवाजा भागात डोंगरावरील दरड कोसळली.
घोटी : जोरदार पावसामुळे मुंबईला वीजपुरवठा करणाऱ्या वैतरणा जलविद्युत प्रकल्पाच्या मुख्य दरवाजा भागात डोंगरावरील दरड कोसळली. यासह मोठ्या प्रमाणावर डोंगरावरील पाण्याचा प्रवाह आतमध्ये घुसला. या घटनेत प्रकल्पात उभी असलेली वाहने वाहून गेल्याचे समजते. काही वाहने चेंबली असल्याचेही कळते. प्रवेशद्वारावरील दोन पोलीस चौक्या उध्वस्त झाल्या आहेत. पोलीस आणि सुरक्षा रक्षकांची हत्यारेही वाहून गेल्याचे वृत्त आहे. येथील पोलीस आणि सुरक्षारक्षकांसह अन्य व्यक्ती तात्काळ बाहेर पडल्याने सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही. दोन पोलिसांच्या रायफली पाण्यात वाहून गेल्या आहेत. चार दुचाक्याही वाहून गेल्या आहेत. कामगारांना सेवा देणारे मोठे वाहन मध्ये अडकले आहे. वीजनिर्मिती केंद्राकडे जाणाºया रस्त्यावरही दरड कोसळली असल्याने रस्ता बंद झाला आहे. विजनिर्मितीचे काम थांबवण्यात आले असून पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंग, प्रांताधिकारी राहुल पाटील, तहसीलदार वंदना खरमाळे-मांडगे आदी अधिकार्यांनी घटनास्थळी भेट दिली आहे.
घोटीपासून जवळच वैतरणा धरणावर जलविद्युत प्रकल्प कार्यरत आहे. धरणाच्या पाण्याच्या वापरातून वीज निर्मिती येथे करण्यात येते. हा जलविद्युत प्रकल्प डोंगराच्या कडेला आहे. बुधवारी रात्री पासून या परिसरात ढगफुटीसारखा जोरदार पाऊस कोसळला. या पावसामुळे डोंगरावरील मोठ्या प्रमाणावरील एक दरडीचा भाग थेट जलविद्युत प्रकल्पाच्या मुख्य प्रवेशद्वारावर कोसळला. यात दोन पोलीस चौक्या उध्वस्त झाल्या. पोलिसांच्या दोन रायफली आणि चार दुचाकी वाहून गेल्या आहेत. यासोबत जोरदार पाण्याचा लोंढा प्रकल्पावर सुरू झाला. यामध्ये दोन पोलीस चौक्या उध्वस्त झाल्या आहे. अचानक झालेली घटना घडताच पोलीस आणि सुरक्षा रक्षकांनी जीव वाचवण्यासाठी पळ काढला.