तपोवनातील ‘रामसृष्टी’ हरविली गाजरगवातात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2019 07:51 PM2019-01-06T19:51:03+5:302019-01-06T19:52:58+5:30
नाशिक : तपोवनात येणाऱ्या हजारो भाविक पर्यटकांना सहकुटुंब वृक्षराजीच्या सान्निध्यात बसून निवांत क्षण घालवता यावे तसेच बालगोपाळांना आनंदाने बागडता ...
नाशिक : तपोवनात येणाऱ्या हजारो भाविक पर्यटकांना सहकुटुंब वृक्षराजीच्या सान्निध्यात बसून निवांत क्षण घालवता यावे तसेच बालगोपाळांना आनंदाने बागडता यावे आणि वनभोजनाचा आनंद लुटता यावा, या उद्देशाने ‘रामसृष्टी’ साकारली गेली; मात्र नव्याचे नऊ दिवस लोटल्यानंतर तपोभूमीतील ‘रामसृष्टी’च्या नशिबी वनवास आला तो कायमचाच.
लाखो रुपये खर्च करून महापालिकेने काही वर्षांपूर्वी जवाहरलाल नेहरू नागरी पुनरुत्थान योजनेअंतर्गत तपोवनात रामसृष्टी उद्यान साकारले. मात्र सध्या या उद्यानाची रया गेली असून, संपूर्ण ‘रामसृष्टी’ गाजरगवत अन् अस्वच्छतेच्या विळख्यात सापडली आहे. रामसृष्टीचा आनंद घेण्यापासून पर्यटक वंचित आहेत. भव्य-दिव्य जागेत साकारलेल्या या उद्यानाची दुरवस्था देखभाल दुरुस्तीअभावी झाली आहे. उद्यानाच्या जागेचा वापर सकारात्मक व विकासाच्या दृष्टिकोनातून उत्तमरीत्या करता येऊ शकेल. गरज आहे ती राजकीय व प्रशासकीय इच्छाशक्तीची.
रामायण सर्किट या केंद्र शासनाच्या योजनेत नाशिकचा समावेश झाला असल्यामुळे रामसृष्टी उद्यानात भविष्यात ‘रामायण’शी संबंधित आगळावेगळा असा प्रकल्पदेखील साकारणे शक्य आहे. मात्र तत्पूर्वी रामसृष्टी उद्यानाला गतवैभव प्राप्त करून देण्याची मागणी त्रस्त नागरिकांनी केली आहे. रामसृष्टी उद्यानाची दुरवस्था रोखणे गरजेचे असून, उद्यानात पर्यटकांना बसण्यासाठी तुटपुंज्या बाकांची संख्या वाढविणे आवश्यक आहे. तसेच आकर्षक पॅगोड्यांची दुरवस्था थांबवून आकर्षक रंगरंगोटीची मागणी नागरिकांनी केली आहे. उद्यानातील नशेबाजांचा उपद्रव थांबविणे आवश्यक आहे.