रामतीर्थावर आज अखेरची शाही पर्वणी
By admin | Published: September 17, 2015 11:52 PM2015-09-17T23:52:59+5:302015-09-17T23:54:40+5:30
रामतीर्थावर आज अखेरची शाही पर्वणी
नाशिक : सप्तर्षींचे स्मरण करत भाद्रपद शुद्ध पंचमी अर्थात ऋषिपंचमीच्या मुहूर्तावर रामघाटावरील गोदावरीत साधू-महंतांसह लाखो भाविक शुक्रवारी (दि. १८) डुबकी घेतील आणि सिंहस्थ कुंभमेळ्यातील नाशिकमधील तीनही शाही पर्वणींचा अध्याय सुफळ संपूर्ण होईल. नाशिकमध्ये होणाऱ्या तिसऱ्या आणि अखेरच्या शाही पर्वणीलाही भाविकांची गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेता जिल्हा प्रशासन कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने सज्ज झाले असून, महापर्वणीप्रमाणेच बंदोबस्ताचे नियोजन ‘जैसे-थे’ राहणार आहे. दरम्यान, गेल्या अडीच-तीन महिन्यांपासून साधुग्राममध्ये वास्तव्यास असलेल्या आखाडे व खालशांतील साधू-महंतांनाही आता परतीचे वेध लागले असून, अनेकांनी सामानाची बांधाबांध करून ठेवण्यास सुरुवात केली आहे.
नाशिक व त्र्यंबकेश्वर याठिकाणी पहिली पर्वणी दि. २९ आॅगस्टला, तर द्वितीय महापर्वणी १३ सप्टेंबरला निर्विघ्न पार पडली. आता नाशिक येथे वैष्णव पंथीयांची अखेरची व तिसरी पर्वणी शुक्रवारी (दि. १८) होत असून, त्र्यंबकेश्वर येथील शैव पंथीयांची अखेरची पर्वणी आठवडाभरानंतर दि. २५ सप्टेंबरला पार पडणार आहे. ऋषिपंचमीच्या मुहूर्तावर नाशिक येथे तृतीय शाहीस्नान होणार असल्याने याही पर्वणीला भाविकांची विशेषत: महिलांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होण्याची शक्यता आहे. तिसऱ्या पर्वणीलाही तपोवनातील साधुग्राममधून लक्ष्मीनारायण मंदिरापासून तीनही प्रमुख आखाडे व खालशांची ब्रह्म मुहूर्तावर शाही मिरवणूक निघेल. या मिरवणुकीत द्वितीय पर्वणीप्रमाणेच आखाड्यांचा क्रम राहणार आहे. मिरवणुकीच्या अग्रभागी निर्मोही आखाडा राहणार असून, मधोमध नेहमीप्रमाणे दिगंबर आखाडा चालणार आहे.
सर्वांत शेवटी निर्वाणी आखाडा रामकुंडाकडे प्रस्थान करेल. अखेरच्या पर्वणीला मात्र हे तीनही आखाडे परतीच्या मार्गाला लागण्यापूर्वी रामघाट परिसरात एकाच ठिकाणी थांबणार आहेत. शेवटी येणाऱ्या निर्वाणी आखाड्याचे शाहीस्नान आटोपल्यानंतर अगोदर निर्वाणी आखाडा परतीच्या मार्गाला लागेल. त्यापाठोपाठ दिगंबर आणि निर्मोही आखाडा साधुग्रामकडे प्रयाण करेल. प्रमुख तीनही आखाडे व खालशांचे शाहीस्नान सकाळी १० वाजेपर्यंत आटोपण्याची शक्यता असून, त्यानंतर भाविकांना रामकुंड खुले करून दिले जाणार आहे.
विघ्नहर्त्या गणरायाचे घरोघरी झालेले आगमन आणि पहिल्या दोन्ही पर्वणीलाच लक्षावधी भाविकांनी लावलेली हजेरी यामुळे तिसऱ्या आणि अखेरच्या पर्वणीला भाविकांची संख्या घटण्याची शक्यता व्यक्त केली जात असली तरी, जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासनाने मात्र कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने बंदोबस्ताची पूर्ण तयारी केली आहे. दुसऱ्या पर्वणीचेच बंदोबस्ताचे नियोजन तिसऱ्या पर्वणीला कायम ठेवण्यात आले आहे. मात्र, भाविकांच्या गर्दीचा अंदाज व परिस्थिती पाहून बंदोबस्त शिथील केला जाणार आहे. शुक्रवारी एकाचवेळी त्र्यंबकेश्वर याठिकाणी पर्वणी नसल्याने पोलीस व जिल्हा प्रशासनाचा ताण बराच हलका झाला आहे.
रिते होऊ लागले साधुग्राम
१४ जुलैला सिंहस्थ कुंभमेळ्याची धर्मध्वजा फडकल्यानंतर तपोवनातील सुमारे ३३५ एकर जागेत साधुग्राममध्ये प्रमुख तीन आखाड्यांसह त्यांच्या आठशेहून अधिक खालशांचा मुक्काम आहे. शुक्रवारी शेवटची शाहीपर्वणी असल्याने साधुग्राम परिसरात साधू-महंतांनाही आता परतीचे वेध लागले आहेत. अनेक खालसे व धार्मिक संस्थांनी, तर तिसऱ्या पर्वणीपूर्वीच साधुग्राम खाली केले आहे. साधुग्राममधील भाविकांचीही वर्दळ आता बऱ्यापैकी कमी झाली असून, अखेरची पर्वणी आटोपल्यानंतर साधुग्राम रिते व्हायला सुरुवात होईल.