रमजान पर्वचा उद्या पहिला ‘रोजा’
By admin | Published: May 27, 2017 12:23 AM2017-05-27T00:23:59+5:302017-05-27T00:24:10+5:30
लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : मुस्लीम समुदायाचा निर्जळी उपवासांचा पवित्र महिन्याला शनिवारी (दि.२७) रात्री पहिल्या तरावीह’च्या विशेष नमाजपठणाने सुरुवात होईल.
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : मुस्लीम समुदायाचा निर्जळी उपवासांचा पवित्र महिन्याला शनिवारी (दि.२७) रात्री पहिल्या तरावीह’च्या विशेष नमाजपठणाने सुरुवात होईल. रविवारी मुस्लीम बांधव पहाटे अल्पोपाहार (सहेरी) करून रमजानचा पहिला उपवास (रोजा) ठेवतील, अशी माहिती शुक्रवारी शाही मशिदीत विभागीय चांद समिती व धर्मगुरूंच्या बैठकीत देण्यात आली. चंद्रदर्शन कोठेही घडले नसल्याचे यावेळी अधिकृतपणे जाहीर करण्यात आले.
उपवासाचा महिना म्हणून सर्वत्र परिचित असलेल्या रमजान पर्वाच्या चंद्रदर्शनाची शक्यता शुक्रवारी वर्तविली जात होती; मात्र चंद्रदर्शन जिल्ह्यासह राज्यात कोठेही घडले नाही. त्याबाबतची अधिकृत माहिती विभागीय चांद समितीला संध्याकाळी प्राप्त झाली. त्यानुसार बैठकीमध्ये समितीचे पदाधिकारी व मौलाना मुफ्ती महेबूब आलम यांच्या अध्यक्षतेखाली शहरातील सर्व धर्मगुरूंची बैठक पार पडली. या बैठकीत रविवारी पहाटे सहेरी करून मुस्लीम समुदायाने रमजानच्या उपवासांना प्रारंभ करावा, असे आवाहन करण्यात आले. मुंबई, अहमदनगर, संगमनेर, मालेगाव, चांदवड आदि ठिकाणी संपर्क साधून चांद समितीने चंद्रदर्शनाची खात्री के ली. त्यानंतर धर्मगुरूंनी चर्चा करून निर्णय घेतल्याची माहिती चांद समितीचे हाजी मीर मुख्तार अशरफी यांनी दिली.
रमजान काळात पहाटे सूर्योदयापूर्वीच अल्पोपाहाराचा विधी करून उपवासाला प्रारंभ केला जातो. संध्याकाळी सूर्यास्तानंतर वेळापत्रकामध्ये नमूद करण्यात आलेल्या वेळेनुसार फलाहार करून उपवास (इफ्तार) सोडला जातो. पाचवेळा काटेकोरपणे नमाजपठणाचे पालन तसेच रात्री ‘तरावीह’च्या विशेष नमाजचे पठण करण्यावर नागरिक या कालावधीत भर देतात.