‘रमजान पर्व’ अंतीम टप्प्यात; बाजारपेठेत वाढला ‘नूर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2019 06:14 PM2019-05-27T18:14:26+5:302019-05-27T18:17:10+5:30

धार्मिकदृष्ट्या अनन्यसाधारण असे महत्त्व प्राप्त असलेल्या रमजान पर्वाला मागील २१ दिवसांपासून सुरूवात झाली आहे. यानिमित्त शहरातील सर्वच मशिदी गजबजलेल्या पहावयास मिळत आहे.

'Ramzan Parva' in the final phase; 'Noor' grew in market | ‘रमजान पर्व’ अंतीम टप्प्यात; बाजारपेठेत वाढला ‘नूर’

‘रमजान पर्व’ अंतीम टप्प्यात; बाजारपेठेत वाढला ‘नूर’

Next
ठळक मुद्देरमजान पर्वाची तीन खंडात विभागणी ईदच्या तयारीला प्रारंभ

नाशिक :मुस्लीम बांधवांचा उपवासांचा (रोजा) पवित्र महिना रमजान पर्व अंतीम टप्प्यांत येऊन पोहचला आहे. सोमवारी (दि.२७) रमजानचे २१ उपवास पूर्ण झाले. येत्या शनिवारी (दि.१) ‘शब-ए-कद्र’ची रात्र शहर व परिसरात साजरी होणार आहे. मुस्लीम बांधवांना ईद-उल-फित्र अर्थात रमजान ईद सणाचे वेध लागले असून बाजारपेठांमध्ये गर्दीत वाढ होऊ लागली आहे.
धार्मिकदृष्ट्या अनन्यसाधारण असे महत्त्व प्राप्त असलेल्या रमजान पर्वाला मागील २१ दिवसांपासून सुरूवात झाली आहे. यानिमित्त शहरातील सर्वच मशिदी गजबजलेल्या पहावयास मिळत आहे. पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत मशिदींमध्ये नमाजपठण करण्यासाठी समाजबांधवांची गर्दी होत आहे. रमजान पर्वाची तीन खंडात विभागणी करण्यात आली असून त्यापैकी कृपा, मोक्षखंडाची समाप्ती झाली आहे. अखेरचा खंड सुरू असून या दहा दिवसांकरिता मशिदींमध्ये २४ तास मुक्काम (एतेकाफ) करण्यावर समाजबांधव भर देतात. वडाळागावातील जामा गौसिया मशिदीत सामुहिक ऐतेकाफ आयोजित करण्यात आला आहे. याअंतर्गत मशिदींमध्ये मुक्काम करणाऱ्या व्यक्तींसाठी पहाटे ‘सहेरी’, ‘इफ्तार’ची व्यवस्था करण्यात आली आहे.
येत्या शनिवारी रमजान पर्वचे २६ उपवास पूर्ण होणार असून या निमित्त सायंकाळी २७ तारखेला मशिदींमध्ये ‘शब-ए-कद्र’ची रात्र साजरी केली जाणार आहे. यानिमित्त मशिदींमध्ये पारंपरिक धार्मिक सोहळा पार पडणार असून मुख्य धर्मगुरूंसह, मशिदीचे काळजीवाहू मौलवींचा सन्मान विश्वस्तांकडून क रण्यात येणार आहे. अखेरचे नऊ उपवास रमजान पर्वचे शिल्लक राहिल्याने मुस्लीम बांधवांमध्ये अधिकाधिक उत्साह पहावयास मिळत आहे. धनिक मुस्लीमांकडून ‘जकात’ वाटपाचे नियोजन करण्यात आले असून समाजातील गोरगरीब, विधवा, अनाथ अश गरजू घटकांसह विविध मदरशांपर्यंत जकातरूपी दानच्या माध्यमातून अर्थसहाय्य केले जात आहे.

ईदच्या तयारीला प्रारंभ
रमजान ईदचा सण अवघ्या नऊ दिवसांवर आल्याने समाजबांधवांकडून ईदच्या तयारीला सुरूवात करण्यात आली आहे. इस्लामी संस्कृतीचा सर्वात मोठा सण म्हणून ईद-उल-फित्रकडे बघितले जाते. या सणाची जय्यत तयारी समाजबांधवांकडून केली जात आहे. शिरखुर्म्यासाठी लागणारा सुकामेवापासून विविध सौंदर्यप्रसाधनांपर्यंत दुकाने बाजारात थाटली आहेत. नवे कपडे, टोपी, पादत्राणे आदि खरेदीकडे नागरिकांचा कल दिसून येत आहे. जुन्या नाशकातील बाजारपेठेत चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. सायंकाळपासून खरेदीची लगबग दिसून येत आहे.

Web Title: 'Ramzan Parva' in the final phase; 'Noor' grew in market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.