सावानाच्या सभेत रणकंदन !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2022 01:19 AM2022-03-14T01:19:48+5:302022-03-14T01:22:10+5:30
१८१ वर्षांच्या सांस्कृतिक परंपरेचा कोणताही मुलाहिजा न बाळगता सावाना कार्यकारिणी आणि त्यांच्या गटातटाच्या समर्थकांनी आरोप, प्रत्यारोप, गौप्यस्फोटासह रणकंदन करीत सावानाच्या पावणेदोन शतकांच्या सभांच्या परंपरेला प्रचंड गालबोट लावले. समर्थकांच्या माध्यमातून घटनेचे दाखले देत आणि त्यातील तरतुदींचा वापर करीत सावानाचे उपाध्यक्ष माजी आमदार नानासाहेब बोरस्ते यांना ऐन सावाना निवडणुकीच्या महिनाभर अगोदर झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्षपदी नियुक्त करण्यात आले. तसेच सभासदत्व नोंदणीसाठी ७ मार्चऐवजी ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णयही गदारोळात घेण्यात आला.
नाशिक : १८१ वर्षांच्या सांस्कृतिक परंपरेचा कोणताही मुलाहिजा न बाळगता सावाना कार्यकारिणी आणि त्यांच्या गटातटाच्या समर्थकांनी आरोप, प्रत्यारोप, गौप्यस्फोटासह रणकंदन करीत सावानाच्या पावणेदोन शतकांच्या सभांच्या परंपरेला प्रचंड गालबोट लावले. समर्थकांच्या माध्यमातून घटनेचे दाखले देत आणि त्यातील तरतुदींचा वापर करीत सावानाचे उपाध्यक्ष माजी आमदार नानासाहेब बोरस्ते यांना ऐन सावाना निवडणुकीच्या महिनाभर अगोदर झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्षपदी नियुक्त करण्यात आले. तसेच सभासदत्व नोंदणीसाठी ७ मार्चऐवजी ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णयही गदारोळात घेण्यात आला.
सावानाची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी (दि.१३) परशुराम साअीखेडकर नाट्यगृहात पार पडली. सावानाचे उपाध्यक्ष नानासाहेब बोरस्ते यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सावानाच्या या सभेत कार्यकर्ते अक्षरश: विरोधी बाजू मांडणाऱ्यांच्या अंगावर धावून जात असल्याचे चित्रदेखील सभेत अनेक वेळा बघावे लागण्याची वेळ आली. नाशिकची सांस्कृतिक मातृसंस्था असलेल्या सावानात गेल्या पाच वर्षांत सुरू असलेली कोर्टबाजी, त्यातून संस्थेची होत असलेली बदनामी आणि शासनाचे भाषा भवन नाशिकला लोकहितवादी नव्हे सावानाच्या नेतृत्वात व्हावे, यासाठी सभासदांनी संस्थेच्या वार्षिक सभेत जोरदार विरोध करीत कार्यकारिणीतील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा निषेध केल्याने सावानाची सभा प्रचंड वादळी ठरली. सभेच्या सुरुवातीपासूनच सदस्यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. विद्यमान कार्यकारिणी कोणताही निर्णय घेताना सदस्यांना विश्वासात घेत नाही. कार्यकारिणीचा सर्व वेळ कोर्टबाजी करण्यात जात असल्याने संस्थेची बदनामी होत असल्याचा आरोप डॉ. शिरीष राजे यांनी आरोप केला. तसेच सावाना देवघेव विभागात नूतनीकरणाच्या डिझाईनचे काम जरी मोफत झाले असले तरी ते काम जातेगावकर यांच्या कुटुंबातील घटकाला देऊन घटनेची पायमल्ली करण्यात आली असल्याचेही राजे यांनी सांगितले. तसेच निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर घटनेप्रमाणे सभासद नोंदणी ३१ मार्चपर्यंतच होणे आवश्यक असल्याचे राजे यांनी नमूद केले. श्रीकृष्ण शिरोडे यांनी गत वर्षाच्या इतिवृत्तावर काय कार्यवाही झाली, याची विचारणा केली. सुनील चोपडा यांनी, सावाना कार्यकारिणी भविष्यात काय काय योजना आखणार आहेत, याबाबत अहवालात तरतूद करण्यात यावी अशी मागणी केली. सावानातर्फे राबविण्यात आलेल्या वसंत कानेटकर नाट्यप्रयोग बंद झाल्याबाबत अहवालात नोंद नसल्याची सुरेश गायधनी यांनी तक्रार केली. यावेळी भरत गोसावी, संदीप गोसावी, सचिन डोंगरे, शिवाजी मानकर, भूषण शुक्ल, रमेश कडलग, हेमंत देवरे, वेदश्री थिगळे, हेमंत राऊत यांनी कार्यकारिणीला प्रश्न विचारले. या सभेत जयप्रकाश जातेगावकर यांनी विषयपत्रिकेचे वाचन केले. प्रा. डॉ.शंकर बोऱ्हाडे यांनी दिवंगतांना श्रद्धांजली वाहिली. प्रा. संगीता बाफना यांनी अभिनंदनाचा ठराव मांडला. देवदत्त जोशी यांनी इतिवृत्ताचे वाचन तर गिरीश नातू यांनी ताळेबंद आणि अंदाजपत्रकाचे वाचन केले. वसंत खैरनार यांनी अहवालाचे वाचन केले. या वेळी व्यासपीठावर सावाना कार्यकारिणीतील धर्माजी बोडके, संजय करंजकर, प्रा. शंकर बोऱ्हाडे, वसंत खैरनार, वेदश्री थिगळे, देवदत्त जोशी, श्रीकांत बेणी, संगीता बाफणा,कुमार मुंगी आदी उपस्थित होते. सभेचे अध्यक्ष नाना बोरस्ते यांनी आभार मानत सभा संपल्याचे जाहीर केले.
---------------------
१ संस्थेचे प्रमुख कार्यवाह जयप्रकाश जातेगावकर यांनी कोरोनाकाळात कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात न करता त्यांना वेळेवर वेतन देण्यात आल्याचे सांगितले. तसेच या वर्षी जानेवारीपासून कर्मचाऱ्यांना वेतनवाढ देण्यात येणार असल्याची घोषणा करीत येत्या २-३ दिवसांत पूर्वलक्षित प्रभावाने देणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
२ रमेश देशमुख यांनी वार्षिक अहवालात शिक्षक निवड समितीचा उल्लेख राहून गेल्याचे तर सचिन निरंतर यांनी वर्षाच्या प्रारंभी निधन झालेले अध्यक्ष प्रा. विलास औरंगाबादकर यांचा फोटोच नसल्याचे निदर्शनास आणून दिल्यानंतर पदाधिकाऱ्यांनी नजरचुकीने राहून गेल्याचे सांगितले.
३ सावानाच्या देवघेव विभागातील वादाप्रसंगी जातेगावकर यांनी खैरनार यांच्या पुतणीने मुक्तद्वार कामासाठी इच्छुक असल्याचे दर्शविल्याचे सांगितले. त्यावर स्पष्टीकरण देताना खैरनार यांनी ते डिझाइन पुतणीने आमच्या वडिलांच्या स्मरणार्थ मुक्तद्वार उभारणीसाठी विनाशुल्क तयार केले होते. तसेच सावानाला जेव्हा -केव्हा मुक्तद्वार उभारायचा असेल त्या वेळी वडिलांच्या स्मृतीखातर ५ लाख रुपयांची देणगी देण्याची तयारी असल्याचा पुनरुच्चार सभेत केला.
४ लायब्ररी ऑन व्हिल्सबाबत आरोप झाल्यानंतर त्याबाबतचे स्पष्टीकरण देताना ॲड. भानुदास शौचे यांनी हे काम माझ्याकडे गत दोन महिन्यांपासून आले असून कामात विलंब झाला असला तरी ते काम सर्वोत्तम प्रकारे लवकरच कार्यान्वित झाल्याचे दिसेल, असे नमूद केले.