राणेंनी राजकारणातून संन्यास घ्यावा : महाजन
By admin | Published: April 16, 2015 12:06 AM2015-04-16T00:06:31+5:302015-04-16T00:23:39+5:30
राणेंनी राजकारणातून संन्यास घ्यावा : महाजन
नाशिक : सलग दुसऱ्यांदा पराभवाचा सामना केलेल्या नारायण राणे यांनी आता राजकारणातून संन्यास घ्यायला हवा. त्यांची दोन्ही मुले राजकारणात सक्रिय असून, त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून द्यायला हवे, असा सल्ला जलसंपदामंत्री तथा पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिला.
गेल्या विधानसभा निवडणुकीनंतर वांद्रे पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत सलग दुसऱ्यांदा नारायण राणे यांना दारुण पराभवाचा सामना करावा लागला. या पार्श्वभूमीवर महाजन यांना नाशिकमध्ये एका खासगी कार्यक्रमात विचारले असता, त्यांनी हे वक्तव्य केले. नारायण राणे हे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी सलग वीस वर्षे कोकणातून प्रतिनिधित्व केले आहे. मुख्यमंत्री तथा महसूलमंत्री पदाचाही कार्यभार सांभाळला आहे. मात्र, गेल्या सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीपाठोपाठ वांदे्र पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीतही त्यांना दारुण पराभवाचा सामना करावा लागल्याने त्यांनी आपली राजकीय घोडदौड थांबवायला हवी. त्यांची दोन्ही मुले राजकारणात असल्याने त्यांना आता संधी द्यायला हवी. तसेच पुन्हा अशाप्रकारची निवडणूक लढविण्याचे धाडस करू नये, असेही महाजन यांनी सांगितले. (प्रतिनिधी)