‘रंग मऱ्हाटमोळा’ने लोकोत्सवचा प्रारंभ!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2021 04:13 AM2021-02-08T04:13:49+5:302021-02-08T04:13:49+5:30
नाशिक : वासुदेव नृत्यापासून गोंधळी नृत्यापर्यंत आणि लेझीमपासून कोळी नृत्यापर्यंत आणि खंडेरायाच्या लग्नाला ते अप्सरा आली आणि जीवा शिवाची ...
नाशिक : वासुदेव नृत्यापासून गोंधळी नृत्यापर्यंत आणि लेझीमपासून कोळी नृत्यापर्यंत आणि खंडेरायाच्या लग्नाला ते अप्सरा आली आणि जीवा शिवाची बैलजोड ते गोमू संगतीनं अशी एकाहून एक सदाबहार गीतांनी नटलेल्या ‘रंग मऱ्हाटमोळा’ च्या सादरीकरणाने लोकोत्सव २०२१ ला प्रारंभ झाला.
बाबाज् थिएटर्स आणि धर्मवीर युवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारपासून ‘लोकोत्सव २०२१’ सांस्कृतिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख पाहुणे म्हणून श्री कपिकुल सिद्धपिठमच्या महंत तपोमूर्ती वेणाभारती आणि उपमहापौर भिकूबाई बागुल व मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले. बाबाज् थिएटर्सचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत जुन्नरे यांनी स्वागत करून उपक्रमामागील संकल्पना विशद केली. प्रा. प्रीतिश कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी प्रकाश साळवे यांचा सत्कार करण्यात आला.
लोकोत्सवाच्या प्रारंभी आर.एम. ग्रुप प्रस्तुत ‘रंग मऱ्हाटमोळा’ हा लोकसंगीताचा कार्यक्रम सादर करण्यात आला. ३५ कलाकारांंनी नृत्य, गायन वादनाने त्यात रंग भरले. यावेळी दीपक लोखंडे, श्रीकांत गायकवाड, सार्थक खैरनार, अमित पगारे, ॲना कांबळे यांनी विविधरंगी गाणी गायली. त्यांना फारुक पिरजादे, गंगा हिरेमठ, कन्हैया खैरनार, अमित तांबे, जतीन दाणी, बाबा सोनवणे यांनी सुरेल साथसंगत केली. धृवकुमार तेजाळे, प्रकाश साळवे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी किसन बल्लाळ, नारायण गायकवाड, मनीष बागुल, अजय बागुल, मनोहर बागुल आदी पदाधिकारी उपस्थित होते. किशोर बागुल यांनी आभार मानले.