निफाड तालुक्यात रंगला ग्रामपंचायत निवडणुकीचा फड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2021 08:51 PM2021-01-11T20:51:10+5:302021-01-12T01:23:06+5:30
सुदर्शन सारडा ओझर : निफाड तालुक्यातील होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीचा फड चांगलाच रंगला आहे. तालुक्यातील पाच ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत, तर ६० ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी १,१३१ उमेदवार रिंगणात आहेत.
निफाड तालुका हा एके काळी सहकार सम्राटांचा होता. त्याचे बिरुद आता नामशेष झाले झाले असले, तरी राजकीयदृष्ट्या अतिशय सजग असणाऱ्या या तालुक्यात आताही ग्रामपंचायत निवडणुकीत चुरस दिसून येत आहे. तालुक्यातील ६० ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत असून, पाच ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध झाली आहे. त्यात १४७ उमेदवार बिनविरोध निवडले गेले, तर ५२४ जागांसाठी मतदान होत आहे. दरम्यान, राज्याच्या राजकारणात महाविकास आघाडी सत्तेत असली, तरी निफाड तालुक्यातील अनेक गावांमध्ये त्यांच्याच कार्यकर्त्यांमध्येच सामना बघायला मिळत आहे. गावगाड्याच्या राजकारणाला वेग आला असून, गल्लो-गल्ली, वाड्या-वस्त्यांवर बैठकांना जोर आला आहे. अण्णा, तात्या, मामा काका, भाऊ आणि तरुणांचे सोशल ग्रुप ओसंडून वाहत आहेत. अनेक ठिकाणी पॅनलची तोडफोड झाली आहे. आपल्याला उमेदवारी मिळाली नाही, म्हणून दुसऱ्या गटाकडे जाऊन उमेदवारी मिळविल्याचे चित्र अनेक ठिकाणी बघायला मिळते. दरम्यान, द्राक्षपंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निफाड तालुक्यात पडलेल्या अवकाळी पावसाच्या तडाख्याने चिंतेत भर टाकली असतानाच, ग्रामपंचायत निवडणुकीचे वातावरण तापले असून, गाव, वस्ती, वाड्या, शेत-शिवारात प्रचाराच्या रणधुमाळीला वेग आला आहे. ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये प्रत्यक्ष पक्ष सहभागी नसले, तरी राजकीय पक्षांच्या कार्यकर्ते-समर्थकांनी उमेदवारी केली असून, हे पक्ष निफाड तालुक्यातील ग्रामपंचायतीमध्ये आपल्या पक्षाचा झेंडा फडकवा, म्हणून वाटेल ती मेहनत घेतानाचे सध्या तरी चित्र दिसत आहे. तालुक्यातील दावचवाडी, सुंदरपूर, सुभाषनगर, ओणे, नांदगाव या ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध झालेली आहे.
प्रपंचातील निशाण्या
जिल्ह्यात निफाडचे राजकारण वेगळ्या पद्धतीचे असते. सध्या संसारात दैनंदिन उपयोगी वस्तू याच निवडणुकीच्या निशाण्या झाल्या असून, त्यामुळे नेमकी कोणत्या गावात कोणती निशाणी बाजी मारते, हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे.
या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला!
लासलगांव येथे होळकर-पाटील यांचेतील पारंपरिक सत्तासंघर्ष या निवडणुकीत पुन्हा बघावयास मिळणार आहे. मुंबई बाजार समितीचे संचालक जयदत्त होळकर, नाफेडचे संचालक नानासाहेब पाटील, माजी आमदार कल्याणराव पाटील, प्रकाश पाटील यांची भूमिका व राजकीय डावपेच महत्त्वाचे ठरेल. प्रदीर्घ काळ ग्रामपंचायत ताब्यात ठेवत काँग्रेसचा बालेकिल्ला बनविलेल्या उगांवला प्रदेश सरचिटणीस राजाराम पानगव्हाणे यांचे बंधू भास्करराव पानगव्हाणे यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असलेले बाळासाहेब क्षीरसागार यांनाही त्यांच्या मायभूमी असलेल्या शिवडी गावची सत्ता अबाधित ठेवण्यासाठी जोर लावावा लागत आहे. याचबरोबर, आदर्श गाव ठरलेल्या व राजकीय पटलावर नेहमीच चर्चेत राहिलेले करंज गावातील खंडू बोडके पाटलांच्या सक्रियतेमुळे ग्रामपंचायत निवडणुकीत रंगत आली आहे. नैताळे येथील लढतही नेहमीच सोशल मीडियातून जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचविण्यात वाकबगार आहे. राष्ट्रवादीत स्थिरावलेले राजेंद्र डोखळेंना कोठुरेची गढी ताब्यात मिळण्यासाठी कंबर कसावी लागणार आहे. निफाड तालुक्यातील जिल्हा स्तरावरील नेत्यांचे गावातील गट अन कार्यकर्ते सांभाळण्यासह आपापल्या सत्तांची पायाभरणी अधिक भक्कम करण्यासाठी नेतेमंडळींना रात्रीचा दिवस करावा लागत आहे. तरुण उमेदवार ज्येष्ठांच्या शब्दाला किती प्रमाण देतात, हे बघणे रंजक ठरणार आहे.