रंगला शिक्षकांचा नक्षत्र कलाविष्कार सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2020 04:13 AM2020-12-29T04:13:26+5:302020-12-29T04:13:26+5:30
नाशिक : के. के. वाघ शिक्षण संस्थेच्या संकुलात ‘नक्षत्र २०२०-२१’ या अनोख्या शिक्षक कलाविष्कार सोहळ्यात शिक्षकांनी उत्स्फूर्तपणे विविध प्रकारच्या ...
नाशिक : के. के. वाघ शिक्षण संस्थेच्या संकुलात ‘नक्षत्र २०२०-२१’ या अनोख्या शिक्षक कलाविष्कार सोहळ्यात शिक्षकांनी उत्स्फूर्तपणे विविध प्रकारच्या कलागुण स्पर्धांमध्ये सहभाग घेत, त्यांचे कलागुण सादर केले.
शिक्षक हा समाज परिवर्तन करणारा महत्त्वाचा घटक असून सक्षम व आदर्श पिढी घडविण्याचे सामर्थ्य शिक्षकांमध्ये असल्यामुळे अशा शिक्षकांना अष्टपैलू बनविणे ही काळाजी गरज आहे हे ओळखून के.के.वाघ शिक्षण संस्थेतील शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाचे समन्वयक डॉ.भूषण कर्डीले, यांच्या प्रोत्साहन व मार्गदर्शनामुळे के.के.वाघ संकुलात नक्षत्र २०२०-२१ या अभिनव उपक्रमांतर्गत शिक्षकांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाद्वारे शिक्षकांना त्यांच्यातील प्रतिभा दाखविण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले. शिक्षकांना त्यांच्या दैनंदिन नित्यक्रमातून विरंगुळा मिळावा, तसेच त्यांच्यातील सुप्त गुणांचा विकास व्हावा व त्यांना कलागुण सादर करण्याची संधी मिळावी, यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले हाेते. त्यासाठी संस्थेने गायन, नृत्य, चर्चासत्र, स्वरचित कविता, कथाकथन, हस्ताक्षर, चित्रकला, एकपात्री नाटक स्पर्धा इ.विविध स्पर्धांचे आयोजन केले. या स्पर्धेच्या निमित्ताने शिक्षकांना त्यांच्या शालेय जीवनातील स्मृतींना उजाळा मिळाला.
स्पर्धेच्या पुरस्कार वितरणासाठी प्रमुख पाहुणे म्हणून नाशिक विभागीय शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी व कवी लक्ष्मण महाडिक उपस्थित होते. स्पर्धांसाठी परीक्षक म्हणून आनंद काळे, जयंत पाटेकर, संजय वाघ, मकरंद हिंगणे, योगिता भामरे, पल्लवी सावकार, शिल्पा देशमुख, सुचिता चापेकर, अरुण ढोके, संदीप पगारे आदी मान्यवर उपस्थित होते. स्पर्धांसाठी शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाचे समन्वयक डॉ.भूषण कर्डीले, डॉ.व्ही.एम.सेवलीकर, ए.के.दीक्षित, वाय. के. ढगे व सर्व शाळांचे प्राचार्य यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
शिक्षकांना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तिपत्रक व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.