जिल्ह्यात रंगली सोशल खेचाखेची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2019 12:57 AM2019-10-12T00:57:58+5:302019-10-12T00:58:55+5:30
विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी तापली असून, जिल्ह्यातील सर्वच मतदारसंघात प्रचारतोफा डागल्या जात आहेत. त्यात उमेदवारांपेक्षा कार्यकर्त्यांमध्येच रस्सीखेच अन् ‘सोशल खेचाखेची’ सर्वसामान्य मतदारांसाठी डोकेदुखी ठरत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
नाशिक : विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी तापली असून, जिल्ह्यातील सर्वच मतदारसंघात प्रचारतोफा डागल्या जात आहेत. त्यात उमेदवारांपेक्षा कार्यकर्त्यांमध्येच रस्सीखेच अन् ‘सोशल खेचाखेची’ सर्वसामान्य मतदारांसाठी डोकेदुखी ठरत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
सध्या विधानसभा निवडणुकीची कट्ट्या-कट्ट्यावर चर्चा रंगत आहे. कोणत्या मतदारसंघात कोण उमेदवार तसेच त्याच्या विजयाची समीकरणे मांडली जात आहेत. याच शिवाय सोशल मीडियावर उमेदवारांचा जोरदार प्रचार सुरू असून, त्यामध्ये एकमेकांची खेचाखेचीही मतदारांसाठी मनोरंजनाचा भाग ठरत आहे. चहाची टपरी, पान ठेले, केश कर्तनालय, सार्वजनिक वाचनालय परिसर, चौकाचौकांतील कट्ट्यांना सध्या राजकीय व्यासपीठच जणू मिळाल्याचा भास होऊ लागला आहे. यात युवा वर्ग तर निवडणूक म्हणजे उत्सवच समजत आहेत. दिवसा एका उमेदवाराची तर रात्री दुसऱ्या उमेदवारच्या पालखीचे भोई होत असून, ‘सोयी’चे राजकारण करतानाही दिसू लागले आहेत.