बारावी परीक्षेच्या आधी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती अर्ज भरण्यासाठी रांगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2018 05:26 PM2018-02-20T17:26:10+5:302018-02-20T17:33:09+5:30
बारावीची परीक्षा देणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना परिक्षेच्या दिवसार्पयत शिष्यवृत्तीचे ऑफलाईन अर्ज भरण्यासाठी रांगा लाऊन उभे राहण्याची वेळ आली. त्यामुळे एकीकडे परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांना तणावमुक्त राण्याचे सल्ले दिले जात असताना शासनाकडून विद्यार्थ्यांवर तणावपूर्ण स्थिती लादली जात असल्याचे समोर आले आहे.
नाशिक : समाज कल्याण विभागाने शिष्यवृत्तीचे ऑनलाईन अर्ज भरून घेतल्यानंतर परीक्षेच्या तोंडावर पुन्हा ऑफलाईन अर्ज भरून घेण्याचा घाट घातला आहे. त्यामुळे बारावीची परीक्षा देणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना परिक्षेच्या दिवसार्पयत शिष्यवृत्तीचे ऑफलाईन अर्ज भरण्यासाठी रांगा लाऊन उभे राहण्याची वेळ आली. त्यामुळे एकीकडे परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांना तणावमुक्त राण्याचे सल्ले दिले जात असताना शासनाकडून विद्यार्थ्यांवर तणावपूर्ण स्थिती लादली जात असल्याचे समोर आले आहे.
समाजकल्याण विभागाकडून 2017-18 शैक्षणिक वर्षासाठी जुलै ते नोव्हेंबर दरम्यान विविध विद्याशाखेच्या विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्तीचे अर्ज ऑनलाइन भरून घेण्यात आले आहेत. परंतु, मागील नऊ ते दहा दिवसांपासून समाजकल्याण विभागाने महाविद्यालयांना विद्यार्थ्यांकडून पुन्हा ऑफलाइन अर्ज भरून घेण्यास सांगितले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त करीत कायमस्वरूपी मार्ग शोधण्याची मागणी केली आहे. यापूर्वी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे अर्ज भरताना विविध समस्या उद्भवत होत्या. त्यावर उपाय म्हणून आणि विद्यार्थ्यांना सर्वच प्रकारच्या शिष्यवृत्तीसाठी एकाच ठिकाणी अर्ज करता यावेत, शासनाच्या विविध योजनांची माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावी, अधिकाधिक विद्यार्थ्यांना शासनाच्या शैक्षणिक योजनांचा लाभ घ्याता यावा या हेतूने सरकारने मागील वषापासून महाडीबीटी हे नवीन संकेतस्थळ सुरू केले होते. परंतु, या संकेतस्थळाचाही विद्यार्थ्यांना लाभ होण्याऐवजी मनस्तापच अधिक सहन करावा लागत आहे. विद्यार्थ्यांनी सर्व्हर डाऊन, आधारकार्ड लिंक करणे, विविध कागदपत्रे दिलेल्या मर्यादेत अपलोड करणे यांसारख्या विविध तांत्रिक समस्या, अडचणींचा सामाना करीत जूलै ते नोव्हेंबर या कालावधीत ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण केली होती. परंतु, विद्यार्थ्यांना महाविद्यालयांनी पुन्हा ऑफलाईन पद्धतीने अर्ज भरून अर्जासह कागदपत्रेही जमा करण्यास सांगितले आहे. त्यामुळे बुधवारपासून परीक्षा सुरू होणार असतानाही बारावीच्या अनेक विद्यार्थ्यांनी व त्यांच्या पालकांनी शिष्यवृत्तीचे अर्ज भरण्यासाठी महाविद्यालयांमध्ये रांगा लावल्या आहेत.