पदाधिकाऱ्यांच्या कक्षांना रंगरंगोटीने आश्चर्य
By admin | Published: October 8, 2014 12:51 AM2014-10-08T00:51:02+5:302014-10-08T00:51:18+5:30
पदाधिकाऱ्यांच्या कक्षांना रंगरंगोटीने आश्चर्य
नाशिक : जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष तसेच चारही विषय समिती सभापतींची निवड झाली असून, त्यातील अध्यक्ष व उपाध्यक्ष यांच्या कक्षांना डागडुजी व रंगरंगोटीचे काम सुरू झाल्याचे चित्र आहे. अन्य चारही सभापतींच्या कक्षांनाही दिवाळीपूर्वीच झळाळी लाभण्याची शक्यता आहे. विधानसभेची ऐन आचारसंहिता सुरू असताना, पदाधिकाऱ्यांच्या कक्षांना अचानक रंगरंगोटी सुरू करण्यात आल्याने जिल्हा परिषदेच्या वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरू झाली आहे. अडीच वर्षांनंतर पदाधिकाऱ्यांची खांदेपालट झालेली असली, तरी जिल्हा परिषदेत ‘नवीन गडी, नवीन राज’ आल्यावर कक्षांना रंगरंगोटी व डागडुजी करण्याची परंपरा तशी जुनीच आहे; मात्र लोकसभेनंतर झालेल्या जिल्हा परिषदेच्या वार्षिक अर्थसंकल्पात पदाधिकाऱ्यांच्या कक्ष व निवासस्थानाच्या डागडुजीचा निधी कमी करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यामुळेच आता पदाधिकाऱ्यांच्या कक्षांना जी रंगरंगोटी व डागडुजी सुरू आहे त्यासाठी निधी नेमका कोठून येणार, या निधी खर्चाला आचारसंहितेत नेमकी कशी मंजुरी घेणार, असे अनेक प्रश्न आता काही सत्ताधारीच सदस्यांनी उपस्थित करण्याची तयारी केली आहे. रंगरंगोटीनंतर डिसेंबरच्या पुरवणी अर्थसंकल्पात या निधी खर्चाची तरतूद करण्याची तयारी पदाधिकाऱ्यांनी केली असली, तरी त्याला जर सभेत विरोध झालाच आणि खर्चाबाबत निधीची तरतूद झाली नाहीच, तर केलेल्या खर्चाची जबाबदारी कोण घेणार, असा प्रश्नही यानिमित्ताने उपस्थित करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)