शाळा प्रवेशासाठी रात्रीच लागल्या रांगा
By admin | Published: December 29, 2015 12:00 AM2015-12-29T00:00:44+5:302015-12-29T00:01:37+5:30
शाळा प्रवेशासाठी रात्रीच लागल्या रांगा
नाशिकरोड : बोचऱ्या कडाक्याच्या थंडीत रविवारी रात्री असंख्य पालक, महिलांनी जेलरोड येथील सेंट फिलोमिना शाळेबाहेर आपल्या पाल्याचा केजीच्या वर्गाचा प्रवेश अर्ज मिळविण्यासाठी रांग लावली होती. शाळा प्रशासनाकडून नियमात बसणाऱ्या व निर्धारित वेळेत येणाऱ्या सर्व पालकांना प्रवेश अर्ज उपलब्ध करून दिलेले असताना सुद्धा पालकांनी प्रवेश अर्जासाठी रात्रीच रांग लावल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
जेलरोड येथील सेंट फिलोमिना शाळेत ज्युनिअर केजी वर्गाच्या तीन तुकड्या असून, त्यामध्ये १८० विद्यार्थ्यांनाच प्रवेश दिला जातो. काही वर्षांपूर्वी शाळेकडून जितक्या जागा आहे तितकेच अर्ज वाटप केले जात होते. त्यामुळे पालक प्रवेश अर्ज मिळविण्यासाठी आदल्या रात्रीच रांगा लावत होते. याचा फायदा घेत काही जणांनी रांगेत नंबर लावण्यासाठी प्रवेश अर्ज किंवा प्रवेश मिळवून देण्याचा ‘धंदाच’ मांडला होता. कडाक्याच्या थंडीत पालकवर्गाला रात्रभर उघड्यावर पाल्याच्या प्रवेश अर्जासाठी रांगा लावण्याचा व त्यातून होणारा गैरप्रकार लक्षात घेऊन शाळा प्रशासनाकडून नियमानुसार व निर्धारित वेळेत येणाऱ्या प्रत्येकाला प्रवेश अर्ज उपलब्ध करून देण्यास सुरुवात करून देण्यात आली.
तरीही लागली रांग
सेंट फिलोमिना शाळेत ज्युनिअर केजीच्या वर्गात आगामी शैक्षणिक वर्षात प्रवेश देण्यासाठी सोमवारी प्रवेश अर्ज वाटप करणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. जून मध्ये ज्या पाल्याला चार वर्षे पूर्ण होतील त्यांना सर्वांना प्रवेश अर्ज देण्यात आले. तरीदेखील रविवारी सायंकाळनंतर पाल्याचा प्रवेश अर्ज मिळविण्यासाठी काही पालकांनी उपस्थिती दर्शविली होती.
सदर माहिती पाल्याचा शाळेत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या संबंधित पालकवर्गाला समजताच एकेक करत असंख्य पालक, महिलांनी रविवारी रात्रीच रांग लावण्यास सुरुवात केली. याचवेळी कोणीतरी एक वही आणून रांगेत ज्या क्रमांकाने उभे आहेत त्या क्रमांकाने नावे लिहिण्यास सुरुवात केली. रात्री जवळपास २५०-३०० पालकांनी प्रवेश अर्जासाठी रांग लावली होती.
कडाक्याच्या बोचऱ्या थंडीत पालकांनी शेकोट्या पेटवून, मोबाइलवर गेम खेळत, गाणे-चित्रपट बघत एकमेकांचा आधार बनत गप्पागोष्टी करीत संपूर्ण रात्र जागून काढत सोमवारी सकाळी शाळेत प्रवेश अर्ज वाटपास सुरुवात झाल्यानंतर रांगेत जाऊन प्रवेश अर्ज मिळविले. (प्रतिनिधी)