रानी नाचे मोर, कृष्णपिसे थोर...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2018 12:49 AM2018-09-04T00:49:21+5:302018-09-04T00:49:54+5:30
गीतेसारखं भलमोठं तत्त्वज्ञान सांगणारा, आपल्या उपस्थितीनेही पांडवांच्या पक्षात विजय आणणारा , प्रेमाचे प्रतीक असलेला कृष्ण हे एक अजब रसायन आहे. त्याचे देवत्व, असामान्यत्व अनेक लीलांमधून समोर येते
नाशिक : गीतेसारखं भलमोठं तत्त्वज्ञान सांगणारा, आपल्या उपस्थितीनेही पांडवांच्या पक्षात विजय आणणारा , प्रेमाचे प्रतीक असलेला कृष्ण हे एक अजब रसायन आहे. त्याचे देवत्व, असामान्यत्व अनेक लीलांमधून समोर येते. कवी आणि गीतकार प्रशांत भरवीरकर यांचे शब्द आणि बासरीवादक मोहन उपासनी यांनी या शब्दांना चढविलेले सुरांचे कोंदण यामुळे गोकुळअष्टमीच्या दिवशी काळजाला मोरपीस स्पर्शून जाणारी मैफल नाशिककरांनी अनुभवली. कापड बाजारातील श्री व्यंकटेश बालाजी संस्थान आणि वेणुनाद या संस्थेच्या संयुक्त विद्यमाने ‘शब्द सूर संवाद’ या मालिकेतील चौथे पुष्प ‘कृष्णार्पण’ या मैफलीच्या माध्यमातून गुंफले गेले. ‘राधाबाई आली चाहूल’ या गीताने मैफलीस प्रारंभ झाला. ‘कोठे धाव अंतरीची’, ‘राधेच्या पायी गं’, ‘वेड्यावानी झाले सारे’, ‘अलगद येई सांज’, ‘देह झाला स्वर जेव्हा’, ‘रानी नाचे मोर,कृष्णपिसे थोर’, ‘स्वर येई कुठूनसा’, ‘कान्ह्युल्याची वेडी माया’, ‘परतुनी ये रे कृष्णा’ या गीतांनी उपस्थितांना कृष्णदर्शन घडविले. ‘का लपविशी कंचुकी चुनरी’ ही गवळणही मैफलीची उंची वाढविणारी ठरली. मोहन उपासनी यांची लवकरच यु ट्यूबवर प्रदर्शित होणारी आणि दाक्षिणात्य संगिताची अनूभुती देणारी ‘डोईवर घागर’ ही गवळणही ऐकविण्यात आली. मैफलीचे निरुपण प्रा. डॉ. राहुल पाटील यांनी केले. पुष्कराज भागवत, स्वागता पोतनीस आणि पूर्वा क्षिरसागर यांनी कृष्णगीते सादर केली. संगीत साथ मोहन उपासनी (बासरी), अनिल धुमाळ (सिंथेसायझर), शुभम जाधव (आॅक्टोपॅड), सतीश पेंडसे (तबला) यांनी केली. पराग जोशी यांनी ध्वनीव्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळली.यावेळी मेधा उपासनी यांनी मोहन उपासनी यांना स्वत: चितारलेले श्रीकृष्णाचे चित्र भेट दिले. प्रारंभी संस्थानच्या वैशाली बालाजीवाले यांनी कलावंतांसह उपस्थितांचे स्वागत केले. कवी किशोर पाठक, सी.एल. कुलकर्णी व मिलिंद गांधी यांच्या हस्ते कलावंतांचा सत्कार करण्यात आला.
झुल्यावर बाळकृष्ण
श्री व्यंकटेश बालाजी संस्थानच्या मंदिरात गोकुळअष्टमी साजरी करण्यात आली. यावेळी झुल्यावर बाळकृष्णाची मोहक मूर्ती ठेवण्यात आली होती. या मूर्तीचे पूजन पुण्याच्या लक्ष्मी फडणीस, मेधा उपासनी आणि ऐश्वर्या बालाजीवाले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी ‘गोविंदा गोविंदा’चा गजर करत श्रीकृष्णाला वंदन केले.