अपहरण करून तब्बल सहा वर्षे बलात्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2018 12:38 AM2018-09-19T00:38:06+5:302018-09-19T00:38:25+5:30
नांदूरनाका परिसरात राहणाऱ्या मुलीच्या बारा वर्षीय मैत्रिणीस जेवणातून गुंगीचे पदार्थ खाऊ घालून तिचे अपहरण केल्यानंतर दिल्लीतील एका इसमाशी जबरदस्तीने विवाह लावून देण्यात आला़ त्यानंतर संशयित व त्याच्या भावाने वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तब्बल सहा वर्षे या मुलीवर बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
नाशिक : नांदूरनाका परिसरात राहणाऱ्या मुलीच्या बारा वर्षीय मैत्रिणीस जेवणातून गुंगीचे पदार्थ खाऊ घालून तिचे अपहरण केल्यानंतर दिल्लीतील एका इसमाशी जबरदस्तीने विवाह लावून देण्यात आला़ त्यानंतर संशयित व त्याच्या भावाने वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तब्बल सहा वर्षे या मुलीवर बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पीडित मुलगी नाशिकला परतल्यानंतर याचा उलगडा झाला असून, या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात आठ संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, संशयित संगीता होंडे (रा़ विहितगाव, देवळाली कॅम्प) या महिलेला अटक करण्यात आली आहे़
पीडित मुलीने पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार २०१२ मध्ये ती आईसमवेत नांदूर नाका परिसरात राहत होती़ शेजारी राहणारी तिची मैत्रीण गौरी हिची आई संशयित नंदा जाधव हिने जेवणात गुंगीचे औषध खाऊ घातले व गुंगी आल्याचे लक्षात आल्यानंतर एका रिक्षात टाकून संशयित मंगला या महिलेकडे सोडून दिले. मंगलाने महिनाभर एका खोलीत कोंडून नंतर या मुलीस पूजा नावाच्या महिलेकडे पाठविले. तेथून संशयित संगीता, रंजना, राजू व संजय, विनोद यांच्यासोबत दिल्ली व उत्तर प्रदेशातील रतोडा गावी नेले़ या ठिकाणी संजयसोबत जबरदस्तीने लग्न लावून दिले़ यानंतर पीडित मुलीला संशयित संजयकडून प्रतिदिन मारहाण तसेच सन २०१२ ते २२ सप्टेंबर २०१८ या सहा वर्षांच्या कालावधीत बलात्कार केला. संजय, त्याचा भाऊ विनोद या दोघांनीही या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला असून, या मुलीने दोन मुलांनाही जन्म दिला आहे़
पीडित मुलीने विवाह झालेल्या संशयित संजय यास रक्षाबंधनासाठी आईकडे जाण्याचा हट्ट धरला़ त्यानुसार त्याने देवळाली कॅम्प येथून खरेदी केलेल्या महिलेकडे पीडितेला आणले व एक दिवस मुक्कामही केला़ त्यानंतर पुन्हा परतीस निघाला असता पीडितेने मनमाड रेल्वेस्थानकावर धावत्या रेल्वेतून उतरून घेतल्याने २४ आॅगस्टला या मुलीला तिच्या आईकडे सोडून तो फरार झाला़ या प्रकरणी पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादीनुसार नंदा जाधव, मंगला, पूजा, संगीता, रंजना, राजू, संजय व विनोद या आठ संशयितांविरोधात अपहरण, बलात्कार, लहान मुलांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण (पोस्को) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
पोलिसांची टाळाटाळ
पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यासाठी धाव घेतली़ मात्र, संबंधित पोलीस कर्मचाºयांनी गुन्हा नोंदवून न घेता आपसात प्रकरण मिटविण्याचा सल्ला देत मुलीला व तिच्या नातेवाइकांनाच दमबाजी केली़ याबाबत अत्याचारविरोधी कृती समितीचे राहुल तुपलोंढे व कार्यकर्त्यांना याबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पोलीस आयुक्त डॉ़ रवींद्र सिंगल यांची सोमवारी (दि़ १७) भेट घेत परिस्थिती समजावून सांगितली़ यानंतर आयुक्तांच्या आदेशानंतर आडगाव पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला़