राज्याच्या वीज मागणीत झपाट्याने वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 04:14 AM2021-03-06T04:14:47+5:302021-03-06T04:14:47+5:30
एकलहरेः कोरोनाचा प्रादुर्भाव हळूहळू कमी होत असल्याने जनजीवन पूर्वपदावर येण्याबरोबरच सर्वत्र उद्योगधंदे, कारखाने सुरु होऊन औद्योगिक, कृषी व घरगुती ...
एकलहरेः कोरोनाचा प्रादुर्भाव हळूहळू कमी होत असल्याने जनजीवन पूर्वपदावर येण्याबरोबरच सर्वत्र उद्योगधंदे, कारखाने सुरु होऊन औद्योगिक, कृषी व घरगुती वीजेचा वापर वाढू लागल्याने गेल्या पंधरवाड्यापेक्षा सद्यस्थितीत वीजेच्या मागणीत वाढ झाली आहे असून, शुक्रवारी दुपारपर्यंत राज्याची मागणी २५ हजार मेगाव्हॅटपर्यंत पोहोचली आहे.
सध्या महानिर्मितीचे राज्यातील २८ संचांपैकी २४ संच सुरु असून, ४ संच वेगवेगळ्या कारणाने बंद आहेत. नाशिकच्या तीन संचांपैकी एका संचाचा कोळसा खासगी कंपणीस देण्यात आल्याने हा संच बंद आहे. परळीच्या तीन संचांपैकी एक संच लिकेजमुळे बंद आहे. चंद्रपूर व पारसचे प्रत्येकी एक संच बंद आहेत. उर्वरित २४ संचांमधून साडेसोळा हजार मेगाव्हॅटच्या जवळपास वीज उत्पादन सुरु आहे. उन्हाळ्यामुळे विजेची मागणी वाढल्याने वेगवेगळ्या कारणाने बंद असलेले संच लवकरच सुरु करण्यात येतील असे सुत्रांचे म्हणणे आहे.
शुक्रवारी (दि. ५) दुपारी अडीच वाजेदरम्यानच्या आकडेवारीनुसार औष्णिक, गँस, हायड्रो व सोलर मिळून महाजेनकोची वीज निर्मिती ७ हजार ७६२ मेगाव्हॅट तर खासगी क्षेत्रातील जिंदाल, अदानी, एसडब्लुपीजीएल, धारिवाल व इतरांची एकुण ७ हजार २६६ मेगाव्हॅट वीजनिर्मिती अशी एकुण (मुंबई वगळता) १५ हजार ०२९ मेगाव्हॅट वीज राज्यात उपलब्ध होत आहे. महानिर्मितीसह खासगी व इतर स्रोतांची मिळून १६ हजार ३०० मेगाव्हॅट वीज आहे. त्या तुलनेत राज्याची मागणी २४ हजार ८४३ मेगाव्हॅट आहे. राज्याची मागणी लक्षात घेता ८ हजार ५४२ मेगाव्हॅट वीजेचा तुटवडा भासत असून, हा तुटवडा केंद्राच्या कोट्यातून भरुन काढला जात आहे.
एकलहरे(नाशिक) येथील प्रत्येकी २१० मेगाव्हॅटच्या तीन संचांपैकी एकाचा कोळसा खासगी कंपनीकडे वळविला आहे. संच क्रमांक ४ व ५ सुरु असून, त्यातून ३४८ मेगाव्हॅटच्या जवळपास वीज निर्मिती सुरु आहे.
-------
राज्यातील वीज निर्मितीची स्थिती
*एकलहरे- ३४८ मेगाव्हॅट
*कोराडी- १६४८ मेगाव्हॅट
*खापरखेडा- १०६७ मेगाव्हॅट
*पारस- २१८ मेगाव्हॅट
*परळी- ४३७ मेगाव्हॅट
*चंद्रपूर- १९४८ मेगाव्हॅट
*भुसावळ- १०८५ मेगाव्हॅट
*उरण गँस - २५६ मेगाव्हॅट