ममदापूर परिसरात वाडी-वस्तीवर तीव्र पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2018 12:18 AM2018-05-14T00:18:20+5:302018-05-14T00:18:20+5:30

येथे वाडी-वस्तीवर तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून, गावातील टॅँकरची खेप वाढविण्याची मागणी होत आहे. ममदापूर ग्रामपंचायतीने जानेवारी महिन्यामध्ये मागणी केल्यावर मार्च महिन्यात पिण्याच्या पाण्यासाठी टॅँकर सुरू करण्यात आला, परंतु सदर टॅँकरची क्षमता आठ हजार लिटरची असल्याने गावातील लोकांना जास्त पाणी मिळत नाही. परिणामी पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

Rapid water shortage in Wadi-inhabited area near Mamdapur | ममदापूर परिसरात वाडी-वस्तीवर तीव्र पाणीटंचाई

ममदापूर परिसरात वाडी-वस्तीवर तीव्र पाणीटंचाई

Next

ममदापूर : येथे वाडी-वस्तीवर तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून, गावातील टॅँकरची खेप वाढविण्याची मागणी होत आहे. ममदापूर ग्रामपंचायतीने जानेवारी महिन्यामध्ये मागणी केल्यावर मार्च महिन्यात पिण्याच्या पाण्यासाठी टॅँकर सुरू करण्यात आला, परंतु सदर टॅँकरची क्षमता आठ हजार लिटरची असल्याने गावातील लोकांना जास्त पाणी मिळत नाही. परिणामी पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.  वारंवार मागणी करूनदेखील अद्यापही टॅँकरची खेप वाढविण्यात आली नाही. तसेच बेंडके वस्ती, केरे वस्ती, गिडगे वस्ती खडकी या भागात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून, पिण्याच्या पाण्यासाठी व जनावरांच्या पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागते आहे. तांडा वस्तीवर टॅँकर सुरू झाल्याने उसतोडी करून तांड्यावर परत आलेल्या ग्रामस्थांमध्ये खुशी असून, इतर वस्तीवरील शेतकरीवर्गाचा केव्हाही पिण्याच्या पाण्यासाठी उद्रेक होऊ शकतो, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. यावर्षी ममदापूर परिसरात कमी प्रमाणात पाऊस पडला, त्यामुळे गावातील कुठल्याही विहिरीत पाणी नाही. ग्रामपंचायत मालकीची विहीर कोरडी असल्याने जानेवारी महिन्यापासून पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.  वाडी-वस्तीकडे सगळ्या यंत्रणेचे लक्ष कमी असल्याने गावात पिण्याच्या पाण्यासाठी छोटा टॅँकर सुरू असून, बाहेरगावी उसतोडीसाठी गेलेले सर्व लोक गावात परतल्याने पिण्याच्या पाण्याची मोठी पंचाईत झाली आहे. ग्रामसेवक भगवान गायके यांनी गावातील पिण्याच्या पाण्यासाठी ठराव केला तेव्हा वाडी- वस्तीसाठीदेखील ठराव केला मग गाव आणि वस्ती असा भेदभाव कसा? गावातील लोकांना पाणी आहे मग वाडी-वस्तीवर पाण्याची काहीच गरज नाही का ? असा प्रश्न शेतकरीवर्गाला पडला आहे.  ममदापूर येथील ग्रामस्थांचा कायमचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी या परिसरातील मेळाचा बंधारा होणं गरजेचं असून तो झाला तर परिसरातील पाच ते सहा गावांतील पिण्याच्या पाण्याची व्यवस्था होऊ शकते. ग्रामपंचायत सरपंच, ग्रामसेवक यांनी याबाबत लक्ष घालून उन्हाळ्याचे राहिलेले पंधरा ते वीस दिवस पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी होत आहे.
साठवलेले पाणी झाले पिवळे
शेतकरीवर्गाने आपल्या शेतातील विहिरीत जानेवारी महिन्यात साठवलेले पाणी सध्या पिवळ्या रंगाचे झाले असून, तेच पाणी पिण्याची वेळ आली आहे. वाडी-वस्तीकडे सगळ्यांचे दुर्लक्ष असून, ग्रामपंचायत सरपंच, सदस्य, ग्रामसेवक यांना पिण्याच्या पाण्याच्या टॅँकरविषयी विचारले असता टॅँकर उद्या सुरू होईल असे सांगितले जाते. परिसरातील विहिरीना पाणी कमी असल्याने बऱ्याच ठिकाणांहून महिलांना रिकाम्या हाताने परत फिरावे लागत असल्याने सर्व स्तरातून प्रशासनाच्या दप्तर दिरंगाईचा निषेध व्यक्त केला जात आहे. पंधरा दिवसांपूर्वी नाशिक येथील तहसीलदार व गटविकास अधिकारी यांच्या पथकाने पाहणी करूनदेखील अद्याप वाडी-वस्तीवर टॅँकर चालू झालेला नाही.

Web Title: Rapid water shortage in Wadi-inhabited area near Mamdapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.