‘वनराई’मध्ये पडणार दुर्मीळ २७ प्रजातीच्या झुडुपर्गीय रोपांची भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2019 04:20 PM2019-05-19T16:20:55+5:302019-05-19T16:21:46+5:30
यावर्षी म्हसरूळ येथील वनराईचा तीसरा वाढदिवस अर्थात वचनपूर्ती सोहळा जागतिक पर्यावरणदिनी साजरा करण्यात येणार असून त्यानिमित्ताने दुर्मीळ अशा २७ प्रजातीच्या जंगली झुडुपवर्गीय रोपांची लागवड या ठिकाणी केली जाणार आहे.
नाशिक : वृक्षारोपण करून वाऱ्यावर न सोडता किमान पाच वर्षे त्याच्या संवर्धनाची हमी घेऊन त्यासाठी कष्ट उपसण्याची तयारी ठेवणा-या आपलं पर्यावरण संस्थेने मागील चार वर्षांपासून शहरात ‘नाशिक देवराई’, ‘नाशिक वनराई’ हे दोन प्रकल्प हाती घेतले आहे. याठिकाणी करण्यात आलेल्या हजारो रोपट्यांची दमदार वाढ झालेली आज दिसून येते. येत्या पर्यावरण दिनाच्या औचित्यावर म्हसरूळ शिवारातील वनराईवर २७ प्रजातींच्या दुर्मीळ झालेल्या झुडुपांच्या ५१५ रोपांची लागवड करण्यात येणार आहे. त्यासाठी राज्यातील विविध शहरांमध्ये फिरून झुडूपांची रोपे संस्थेने मिळविली आहेत.
सातपूर शिवारातील वनविभागाच्या जागेवर देवराई विकसीत करण्यासाठी चार वर्षांपुर्वी लोकसहभागातून ११ हजार भारतीय प्रजातीच्या रोपांची लागवड करण्यात आली होती. या रोपांची दमदार वाढ झाली असून मागील वर्षी येथे संस्थेने भर टाकली ती नामशेष होणाºया दुर्मीळ रानवेलींची. जैवविविधता विकसीत करून परिपुर्ण देवराई अन् वनराई साकारण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे अध्यक्ष शेखर गायकवाड यांनी सांगितले. यावर्षी म्हसरूळ येथील वनराईचा तीसरा वाढदिवस अर्थात वचनपूर्ती सोहळा जागतिक पर्यावरणदिनी साजरा करण्यात येणार असून त्यानिमित्ताने दुर्मीळ अशा २७ प्रजातीच्या जंगली झुडुपवर्गीय रोपांची लागवड या ठिकाणी केली जाणार आहे. म्हसरूळ येथील वनविभागाच्या आगारामधील जागेत तीन वर्षांपुर्वी लोकसहभागातून वनमहोत्सवांतर्गत साडेसहा हजार रोपट्यांची लागवड करून त्यांचे संवर्धन करण्यात आले आहे.
या प्रजाती मिळविण्यास यश
फंगला, दिंडा, हेंकल, सर्पगंधा, अश्वगंधा, पत्री निरगुडी, मुरूडशेंग, पांढरा कुडा, तांबडा कुडा, दुरंगी बाभूळ, अरणी, अग्निमंथ, भारंगी, ढायटी, चार प्रकारची कोरांटी, संकुपी, गिडेसा, कपवासी, हिंगणबेट, मेहंदी, काळी निरगुडी अशा विविध प्रजातीचे दुर्मीळ झुडुपवर्गीय वनौषधी रोपट्यांची लागवड जागतिक पर्यावरण दिनी वनराई येथे केली जाणार आहे.