१५० वर्षानंतर दुर्मीळ खगोलीय घटना : बुधवारी चांदोबा केवळ मोठाच नव्हे तर ताम्रवर्णीदेखील दिसेल
By azhar.sheikh | Published: January 30, 2018 09:33 PM2018-01-30T21:33:17+5:302018-01-30T21:38:49+5:30
पाच, दहा नव्हे तर तब्बल चौदा टक्क्यांनी मोठा झालेला आणि तीस टक्क्यांनी अधिक तेजोमय झालेला चंद्र पाहण्याची दुसरी संधी तर ग्रहणामुळे लालसर (ताम्रवर्णी) सूपर मून बघण्याची १५० वर्षानंतर प्रथमच संधी बुधवारी खगोलप्रेमींना मिळणार आहे.
नाशिक : नववर्षाचा पहिला चंद्र नाशिककरांना सूपर मून म्हणून बघता आला; मात्र बुधवारी (दि.३१) नववर्षाच्या पहिल्या महिन्याचा अखेरचा चंद्र हा केवळ सूपर नव्हे तर ‘ब्लू ब्लड मून’ म्हणून बघण्याची संधी खगोलीय अविष्कारामुळे उपलब्ध होणार आहे. संध्याकाळी ६ वाजून २१ मिनिटापासून हा खगोलीय अविष्कार अनुभवता येणार आहे.
जानेवारी महिन्यात दोन पौर्णिमा, चंद्रग्रहण आणि पृथ्वी-चंद्रामध्ये कमी होणारे अंतर असे तीनही बदल एकाच दिवशी बुधवारी घडून येणार असल्यामुळे खगोलशास्त्रज्ञांनी या सर्व बदलांचा अविष्काराला ‘सुपर ब्लू ब्लड मून’असे नाव दिले आहे. १८६६ साली असा खगोलीय अविष्कार अनुभवयास आला होता. पाच, दहा नव्हे तर तब्बल चौदा टक्क्यांनी मोठा झालेला आणि तीस टक्क्यांनी अधिक तेजोमय झालेला चंद्र पाहण्याची दुसरी संधी तर ग्रहणामुळे लालसर (ताम्रवर्णी) सूपर मून बघण्याची १५० वर्षानंतर प्रथमच संधी बुधवारी खगोलप्रेमींना मिळणार आहे.
सर्वात मोठा व दुर्मीळ खगोलीय बदल
एका इंग्रजी महिन्यात दोन पौर्णिमा आल्यास दुस-या पौर्णिमेच्या चंद्रास ब्लू-मून म्हणून संबोधले जाते; मात्र याचा अर्थ चंद्र निळसर रंगाचा दिसेल असे नाही. या महिन्यात दोन तारखेनंतर पुन्हा बुधवारी पौर्णिमा आली आहे. याबरोबरच खग्रास चंद्रग्रहणही होणार आहे. रात्री पावणेदहा वाजपेर्यंत चंद्रग्रहण चालणार आहे. त्यामुळे हा सर्वात मोठा खगोलीय बदल मानला जात असल्याचे स्पेस एज्युकेटर अपुर्वा जाखडी यांनी सांगितले.
संध्याकाळी ६ वाजून २१ मिनिटाला चंद्र पृथ्वीच्या छायेत प्रवेश करणार असून जवळजवळ सात वाजेपर्यंत पृथ्वीची सावली चंद्रावरून पुढे सरकताना दिसू शकेल, असे खगोलशास्त्रज्ञांनी स्पष्ट केले आहे. हा खगोलीय अविष्कार संपूर्ण भारतासह उत्तर अमेरिका, आशिया, आस्ट्रेलियामध्ये दिसणार आहे. चंद्रग्रहण अर्थात पृथ्वीची चंद्रावर पडणारी सावलीमुळे चंद्र ताम्रवर्णी झालेला दिसून येईल. हा खगोलीय बदलाला शास्त्रज्ञांनी सांकेतिक भाषेत ‘ब्लड’ शब्दाने संबोधले आहे.
मोठा चांदोबा रात्री दिसेल अधिक तेजोमय
बुधवारी रात्री साडेनऊ वाजेनंतर चंद्र हा पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे दिसेल, कारण तोपर्यंत चंद्रावरून पृथ्वीची सावली निघून गेलेली असेल. त्यामुळे लख्ख पांढरा शुभ्र प्रकाश चंद्राचा पृथ्वीवर पडल्याचे दिसून येईल किंबहुना नेहमीच्या पौर्णिमेच्या चंद्रापेक्षा ३० टक्क्यांनी अधिक तेजोमय झालेला बघावयास मिळेल.
...म्हणून चांदोबला म्हणतात ‘सुपरमून’
पृथ्वीचा उपग्रह अर्थात चंद्र पृथ्वीभोवती सतत लंबवर्तुळाकार कक्षेमध्ये फिरत असतो. त्यामुळे काही वेळा तो पृथ्वीच्या जवळ येतो, तर काही वेळा लांबही जातो. पौर्णिमेच्या काळात तो पृथ्वीच्या जवळ आल्यास त्याचा आकार मोठा दिसतो. या चंद्राला ‘सुपरमून’ असे संबोधले जाते. वर्षातून एकदा किंवा दोनदा ही घटना घडत असते. यावर्षी एक तारखेप्रमाणेच ३१ तारखेलाही असाच खगोलीय बदलाचा आविष्कार पहावयास मिळणार आहे. त्यामुळे ज्या खगोलप्रेमींना या नववर्षाचा पहिला सुपरमून बघता आला नाही त्यांनी चिंता न करता या महिन्याचा अखेरचा चंद्र बघण्यासाठी स्मार्टफोनमध्ये ‘रिमाइन्डर’ लावण्यास हरकत नाही. डिसेंबर महिन्यात अनेकांना हा सुपरमून बघता आला नव्हता कारण मध्यरात्री चांदोबा ‘मोठे’ झाले होते. खगोल शास्त्रज्ञ रिचर्ड नोले यांनी सन १९७९ मध्ये सर्वप्रथम या आविष्काराला ‘सुपरमून’ असे नाव दिले होते.
१९वर्षानंतर होईल पुनरावृत्ती
१९ जानेवारी २०१९साली पुन्हा सूपर ब्लड मून पहावयास मिळेल; मात्र त्यावेळी दोन पौर्णिमा नसणार आहे. त्यानंतर २६ मे २०२१ साली सूपर मून व चंद्रग्रहण दिसेल. ३१ डिसेंबर २०२८ साली दोन पौर्णिमा येत असल्याने ब्लू मून व चंद्रग्रहण दिसेल. त्यावेळी चांदोबा मोठा झालेला दिसणार नाही कारण पृथ्वीपासून चंद्र लांब अंतरावर असेल. ३१ जानेवारी २०३७ साली आजच्या खगोलीय घटनेची पुनरावृत्ती होईल. तब्बल १९ वर्षानंतर पुन्हा आजच्यासारखी सुपर ब्लू ब्लड मून’ बघावयास मिळू शकेल.
- अपुर्वा जाखडी, स्पेस एज्युकेटर