भागवत यांच्या सनई वादनाने रसिक मंत्रमुग्ध
By admin | Published: February 13, 2017 12:33 AM2017-02-13T00:33:53+5:302017-02-13T00:34:04+5:30
रागेश्री वैरागकरांच्याही गीतांचे सादरीकरण
नाशिक : ‘लागी मोहे शाम से प्रीत’ ही विलंबित एक तालातील रचना, मध्यलयीतील ‘तुम मोहे दर्शन दियो शाम’ या आणि अशा विविध गीतांचे सादरीकरण रागेश्री वैरागकर यांनी रविवारी (दि. १२) कुसुमाग्रज स्मारक येथे झालेल्या संगीत मैफलीत केले.
उस्ताद शाहीद परवेझ संगीत गुरुकुलच्या वर्धापन दिनानिमित्त या संगीत मैफलीचे आयोजन करण्यात आले होते. या मैफलीची सुरुवात गौरी औरंगाबादकर यांनी कथक नृत्यातून सादर केलेल्या गणेशवंदनेने झाली. यावेळी गौरी औरंगाबादकर यांनी आपल्या नृत्यातून थाट, आमद, तत्कार, नटवरी तुकडे सादर करत उपस्थितांची मने जिंकली. संगीत मैफल उत्तरोत्तर रंगत असताना रागेश्री वैरागकर यांनी ‘नदीया खैरी कई’ ही देस रागातील ठुमरी सादर केली, तर कार्यक्रमाची सांगता ‘आगा वैकुंठाच्या राया’ या भजनाने झाली. रागेश्री वैरागकर यांना जगदेव वैरागकर (संवादिनी) आणि नितीन वारे (तबला) यांनी साथसंगत केली.
कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात शहनाई वादक बिसमिल्ला खाँ
यांचे शिष्य पं. शैलेश भागवत यांनी सनई वादन केले. राग शुद्धकल्याण पेश करत भागवत यांनी आपल्या सनई वादनाला सुरुवात केली. यावेळी भागवत यांना सुभाष दसककर (संवादिनी) आणि नितीन पवार (तबला) यांनी साथसंगत केली. कुसुमाग्रज स्मारकाच्या विशाखा सभागृहात झालेल्या या कार्यक्र मावेळी उद्धव अष्टुरकर, सुभाष दसककर, नितीन पवार, रागेश्री वैरागकर, जगदेव वैरागकर, पराग ठाकूर, मंदार ठाकूर, विलास औरंगाबादकर यांच्यासह रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुप्रिया फणसाळकर यांनी केले. (प्रतिनिधी)