भाव-भक्तिगीतांनी रसिक श्रोते मंत्रमुग्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2018 12:55 AM2018-05-23T00:55:54+5:302018-05-23T00:55:54+5:30
श्री गजानन महाराजांची आरती सादर करत विविध भावगीते व भक्तीगीते सादर करून श्रीकांत जोशी यांनी उपस्थित श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.
नाशिकरोड : श्री गजानन महाराजांची आरती सादर करत विविध भावगीते व भक्तीगीते सादर करून श्रीकांत जोशी यांनी उपस्थित श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. दत्तमंदिररोड लायन्स हॉल येथे श्री गजानन ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने आयोजित वसंत व्याख्यानमालेत ‘भावगीते व भक्तीगिते’ या विषयावरील सहावे पुष्प गुंफताना श्रीकांत जोशी यांनी कार्यक्रमाची सुरूवात ‘जय श्री गजानना, सद्गुरू गजानना, भक्तजनाची संकटे, वारिसी दयाधना’ ही स्वरचित आरती सादर करून केली. त्यानंतर गीत रामायणातील ‘स्वये श्रीराम प्रभू ऐकती’ व ‘तोच चंद्रमा नभात’ हे गीत सादर केले. संत ज्ञानोबारायाचा अभंग ‘अधिक देखणे तरी’, पंडित भीमसेन जोशींचे प्रसिद्ध भावगीत गायक कै. अरुण दाते यांना श्रद्धांजली म्हणून ‘भातुकलीच्या खेळामधली’ हे गीत सादर करून उपस्थितांची वाहवा मिळवली. सध्याच्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर लागू पडणारे ५० वर्षापूर्वींचे बाबूजींचे ‘उद्धवा अजब तुझे सरकार’ या गीताने सद्य राजकीय परिस्थितीची जाणीव करून दिली. ‘छेडीली मी आसावरी’, ‘लाजून हसणे अन्’ हे भावगीत उपस्थितांना तारुण्याची आठवण करून देणारे ठरले.
१८ वा अध्यायाचा गीतेचा सार ‘कर्तव्याने घडतो माणूस, जाणून पुरुषार्थ’ व ‘जग हे बंदीशाळा’ हे गीत सादर केले. कार्यक्रमाची समाप्ती ‘देव देव्हाऱ्यात नाही’ व ‘बलसागर भारत होवो विश्वात शोभुनी राहो’ या भैरवीने झाली. जोशी यांना तबल्यावर साथ श्रीकांत कुलकर्णी यांनी दिली. आजचे व्याख्यान, वक्ते : डॉ. बापूराव देसाई , विषय : खान्देशी संस्कृती