माजी खासदार गोडसे यांच्या नेतृत्वाखाली मुंबई-नाशिक रस्ता दुरुस्तीसाठी रास्ता रोको
By संजय पाठक | Published: July 8, 2024 05:33 PM2024-07-08T17:33:14+5:302024-07-08T17:34:22+5:30
शिंदे सेनेचा सरकारला घरचा आहेर!
संजय पाठक, नाशिक- सध्या नाशिक ते मुंबई महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. या संदर्भात विधिमंडळात आवाजही उठवण्यात आला असला तरी अद्याप रस्त्याच्या अवस्थेत कोणती सुधारणा झालेली नाही त्यामुळे शिंदे सेनेचे माजी खासदार हेमंत गोडसे यांच्या नेतृत्वाखाली आज नाशिक शहराजवळ विल्होळी येथे मुंबई आग्रा महामार्गावर रस्ता रोको करून आंदोलन करण्यात आले. यानिमित्ताने हेमंत गोडसे यांनी राज्य सरकारला घरचा आहेर दिला.
नाशिक- मुंबई महामार्गाची शहापूर ते ठाणे दरम्यान दुरवस्था झाली असून दहा- दहा किलोमीटर वाहनांच्या रांगा लागत आहेत तसेच अपघातही होत आहेत मात्र सध्या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू असून अनेक ठिकाणी पूल उभारले जात आहेत त्यामुळे हे काम संथगतीने सुरूच आहे. विशेष म्हणजे रस्त्याच्या अवस्था बिकट असताना देखील टोल आकारणी केली जात आहे. त्यामुळे आज शिंदे सेनेच्या वतीने माजी खासदार हेमंत गोडसे यांच्या नेतृत्वाखाली विल्होळी जवळ महामार्ग रोखून धरल्याने सुमारे तासभर वाहतूक विस्कळीत झाली होती. रस्त्याच्या दोन्ही बाजूने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
दरम्यान महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांनी दोन दिवसात खड्डे बुजवण्यात येईल असे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले आंदोलनात जिल्हाप्रमुख अनिल ढिकले, युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष सदानंद नवले, नाशिक तालुकाध्यक्ष लकी ढोकणे, बाळासाहेब लांबे यांच्यासह अन्य पदाधिकारी सहभागी झाले होते.