घुशीने महिलेचा पंजा कुरतडल्याने झाला मृत्यू, नाशिकमधील प्रकार
By संजय पाठक | Published: April 28, 2023 03:39 PM2023-04-28T15:39:28+5:302023-04-28T15:39:45+5:30
महापालिकेने गटारीचे काम अर्धवट ठेवल्याने परीसरात उंदीर आणि घुशी मेाठ्या प्रमाणात झाल्या आहेत.
नाशिक : शहरातील गंजमाळ भागात गटारीचे काम झाले; मात्र, त्यानंतर त्यांचे कॉंक्रिटीकरण पूर्ण न झाल्याने घुशी फिरत आहे. त्यातूनच
बुधवारी रात्री येथील झोपडीत राहणाऱ्या बबाबाई गायखे वृद्धेचा हात घुशीने कुरतडल्याने रक्तबंबाळ अवस्थेत तिला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मध्यरात्री या महिलेचा मृत्यू झाला. त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे, तर दुसरीकडे महापालिकेच्या कारभाराविषयी संताप व्यक्त करण्यात येत आहेत.
याठिकाणी महापालिकेने गटारीचे काम अर्धवट ठेवल्याने परीसरात उंदीर आणि घुशी मेाठ्या प्रमाणात झाल्या आहेत. त्यामुळे गटारींचे कॉंक्रीटीकरण तातडीने पूर्ण करावे अशी नागरीकांची मागणी होती. मात्र, महापालिकेच्या ठेकेदाराने दाद दिली नाही. त्यातच बुधवारी रात्री बबाबाई गायखे या ९० वर्षांच्या वृद्धेचा हात कुरतडून जवळपास पंजाच नष्ट केला. ही महिला अत्यंत वृद्ध असल्याने फार आरडाओरड करू शकली नाही.
अखेरीस सामाजिक कार्यकर्ते दिपक डोके यांनी तिला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मध्यरात्री १ वाजता या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यामुळे नागरीकांनी संताप व्यक्त करीत महापालिका अधिकारी आणि ठेकेदार यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे.