उन्हाळ कांदा लागवडीच्या दराने गाठला दहा हजारांचा टप्पा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2021 01:07 AM2021-01-04T01:07:43+5:302021-01-04T01:10:31+5:30

मानोरी  परिसरात उन्हाळ कांद्याची लागवड मोठ्या जोमाने सुरू असून,  लागवडीसाठी मजुरांची मात्र शोधाशोध करावी लागत आहे. मजुरांच्या कमतरतेमुळे यंदा उन्हाळ कांदा लागवडीच्या  दराने  प्रति एकरसाठी १० हजारांचा टप्पा गाठला असूनही मजूर मिळत नसल्याने, तसेच रोपे खराब होण्याच्या धास्तीने कांदा उत्पादक शेतकरी चिंतेत सापडला आहे.

The rate of summer onion cultivation reached the stage of ten thousand | उन्हाळ कांदा लागवडीच्या दराने गाठला दहा हजारांचा टप्पा

उन्हाळ कांदा लागवडीच्या दराने गाठला दहा हजारांचा टप्पा

Next
ठळक मुद्देमानोरीत उत्पादक चिंतित मजुरांअभावी रोपे खराब होण्याची धास्ती

मानोरी :  परिसरात उन्हाळ कांद्याची लागवड मोठ्या जोमाने सुरू असून,  लागवडीसाठी मजुरांची मात्र शोधाशोध करावी लागत आहे. मजुरांच्या कमतरतेमुळे यंदा उन्हाळ कांदा लागवडीच्या  दराने  प्रति एकरसाठी १० हजारांचा टप्पा गाठला असूनही मजूर मिळत नसल्याने, तसेच रोपे खराब होण्याच्या धास्तीने कांदा उत्पादक शेतकरी चिंतेत सापडला आहे. दरम्यान, मुखेड, देशमाने, जऊळके, जळगाव नेउर, शिरसगाव, पिंपळगाव लेप आदी परिसरांत लागवडीच्या क्षेत्रात विक्रमी वाढ झाल्याचे दिसून येत आहे.  
मानोरी बुद्रुक, खडकीमाळ, देशमाने, मुखेड आदी परिसरांत कांद्याच्या लागवडीसाठी शेतकऱ्यांना मजुरांची शोधाशोध करावी लागत असून, कोणी मजूर देता का मजूर, असा प्रश्न विचारण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. यंदा कांद्याच्या लागवडीसाठी कोपरगाव, सिन्नर, निफाड आदी तालुक्यांतील मजूर महिला कांदा लागवड पूर्ण करण्यासाठी मानोरी परिसरात दाखल झाले असल्याचे दिसून आले आहे. येवला तालुक्यात यंदा परतीच्या पावसामुळे कांद्याच्या रोपांचे, तसेच बियाण्यांचे नुकसान झाले आहे. दुसरीकडे कांद्याचे भाव सरासरीने टिकून असल्याने यंदा शेतकऱ्यांनी मिळेल तेथून महागड्या दराने का होईना, कांद्याचे रोपे आणि बियाणे खरेदी करून कांदा लागवड करण्यात शेतकरी व्यस्त असल्याचे चित्र दिसत आहे. 
दरवर्षी  डिसेंबर महिन्यात उन्हाळ कांदा लागवड आटोपलेली असल्याचे बघायला मिळत होते. यंदा तीन ते चार वेळा उन्हाळ कांद्याची रोपे आणि बियाणे टाकूनही अवकाळी आणि परतीच्या पावसाने रोपे पूर्णतः वाहून गेली असताना, महागड्या दराने रोपे विकत घेत लागवड केली होती. अनेक ठिकाणी खात्रीशीर बियाणे निघाले नसल्याने, कांद्याच्या बियाण्यांचा खर्च बी उगविण्याच्या आधीच वाया गेला असल्याचे शेतकरी वर्गाकडून सांगण्यात येत आहे. 
महिनाभर आधीच मजुरांची बुकिंग... 
मजूरवर्गाची वानवा भासत असल्याने, महिनाभर आधीच मजुरांना आगाऊ पैसे देऊन कांदा लागवडीला बुकिंग केले जात आहे. मजुरांची मागणी एवढी वाढली आहे की, दररोज संध्याकाळी मजुरांच्या घरी जाऊन शोध घ्यावा लागत आहे. एकाच वेळी अनेक शेतकरी कांदा लागवडीसाठी येत असल्याने, आधी कोणाला प्राधान्य द्यावे, असा प्रश्न मजूरवर्गाला पडत आहे.
कोणी मजूर देता का मजूर... 
पंधरा ते वीस दिवसांपासून सर्वत्र उन्हाळ कांद्याची लागवड सुरू असून, लागवडीसाठी मजूर वर्गाची वानवा भासत आहे. अनेक ठिकाणी दुसऱ्या गावाहून मजूर आणावे लागत आहेत. कांदा लागवडीसाठी साडे आठ ते नऊ हजार रुपये प्रति एकर असा भाव देऊनही दुसऱ्या गावाहून उपलब्ध झालेल्या मजुरांच्या गाडीचे भाडे वेगळेच द्यावे लागत असल्याने, यंदा लागवडीचा दर हा प्रति एकर दहा हजार रुपयांच्या घरात पोहोचला असल्याने कांदा उत्पादक हवालदील झाले आहेत.

Web Title: The rate of summer onion cultivation reached the stage of ten thousand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.