त्र्यंबकेश्वरला रथोत्सव

By admin | Published: November 15, 2016 01:22 AM2016-11-15T01:22:52+5:302016-11-15T01:31:11+5:30

त्रिपुरारी पौर्णिमा : हजारो भाविकांचा सहभाग

Rathotsav to Trimbakeshwar | त्र्यंबकेश्वरला रथोत्सव

त्र्यंबकेश्वरला रथोत्सव

Next

त्र्यंबकेश्वर : त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्ताने सोमवारी दुपारी सव्वाचार वाजता पाच बैलजोड्यांच्या साह्याने ३१ फूट उंचीच्या भव्य रथाची त्र्यंबकेश्वर मंदिरापासून ते कुशावर्त तीर्थापर्यंत मिरवणूक काढण्यात आली. सायंकाळी सातच्या सुमारास ज्या मार्गाने नेला त्याच मार्गाने पुनश्च मंदिराकडे आणण्यात आला. यावेळी संपूर्ण रस्ता आकर्षक फुलांच्या रांगोळ्यानी सजविण्यात आला होता. देवस्थानच्या पारंपरिक वाजंत्री-बॅण्ड पथकाच्या गजरात रथ मिरवणूक काढण्यात आली. रथापुढे विश्वस्त, मानकरी, प्रतिष्ठित चालत होते.
भव्यदिव्य असा हा रथ त्र्यंबकेश्वर तीर्थक्षेत्राबरोबर त्र्यंबकेश्वर देवस्थानचे भूषण समजला जातो. भारतातील प्रमुख ३८ रथांपैकी हा रथ आहे. आज रथ पाहण्यासाठी शहरात हजारो यात्रेकरू, परिसरातील भाविक, स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने आले होते. रविवारी पहाटे २.३० ते ५ वाजेपर्यंत वैकुंठ चतुर्दशी (वैकुंठी) विशेष महापूजा, पालखी सोहळा व हरिहर भेट झाली. त्याच दिवशी वैकुंठ चतुर्दशीनिमित्त सरदार विंचूरकर यांच्या वतीने दुपारी १.३० ते ४ वा.पर्यंत त्यांचे पुरोहित रवींद्र अग्निहोत्री यांनी पूजा केली, तर सोमवारी दुपारी रथ मिरविण्यापूर्वी सरदार विंचूरकर यांच्या वतीने रथाची पूजा, त्र्यंबकेश्वर राजाची महापूजा पुरोहित रवींद्र अग्निहोत्री यांनी केली. पेशवे यांच्या वतीने महामृत्युंजय भगवान त्र्यंबकराजाची महापूजा, दीपमाळेची महापूजा रुईकर यांच्या वतीने दिलीप रुईकर यांनी केली. त्र्यंबकेश्वर देवस्थानचे मानकरी, पूजक आदिंचा उत्स्फू र्त सहभाग होता. देवाची आरती करण्याचा मान विलास वाडेकर (वाडेकर घराणे) यांना असल्यामुळे त्यांनी आरती म्हटली आणि त्यानंतर रथ सुरू करण्यात आला. रथावर ब्रह्मदेवाची मूर्ती ठेवण्यात आली होती.
रथ पूर्णपणे पुष्प सजावटीने शृंगारला होता. त्यामुळे रथाचे सौंदर्य खुलून दिसत होते. मध्यभागी भगवान त्र्यंबकराजाचा पंचमुखी सुवर्ण मुखवटा विराजमान होता. संपूर्ण रस्त्यावर विविध सेवाभावी ग्रुपच्या कार्यकर्त्यांनी पुष्परांगोळ्या रेखाटल्या होत्या. त्यात ज्योतिर्लिंग मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांचा मोलाचा सहभाग होता. रथावर आकर्षक व नयनमनोहर विद्युतरोषणाई करण्यात आली होती. (वार्ताहर)

Web Title: Rathotsav to Trimbakeshwar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.