साडेसात हजार कार्डधारक गमावणार रेशनचा ‘आधार’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:21 AM2021-02-26T04:21:33+5:302021-02-26T04:21:33+5:30
नाशिक: रेशनकार्डाला आधार लिकींग करण्याची मुदत गेल्या १५ तारखेला संपुष्टात आली तेंव्हा ७,३७९ कार्डधारक अजूनही आधाराविना असल्याची बाब समोर ...
नाशिक: रेशनकार्डाला आधार लिकींग करण्याची मुदत गेल्या १५ तारखेला संपुष्टात आली तेंव्हा ७,३७९ कार्डधारक अजूनही आधाराविना असल्याची बाब समोर आली. त्यामुळे या कार्डधारकांना पुढील महिन्यात रेशनवर मिळणारे धान्य बंद होणार आहे. लिंकींगसाठी पुन्हा मुदतवाढ मिळण्याची शक्यता नसल्याने हे रेशनकार्डस् बाद होण्याची देखील शक्यता आहे.
रेशनवर मिळणाऱ्या धान्यांचा लाभ हा पात्र कार्डधारकांनाच व्हावा यासाठी शासनाने आधार लिकींग मोहिम सुरू केलेली आहे. रेशनवरील धान्य वितरण प्रणाली पारदर्शक हाेण्याबरोबरच धान्याचा काळाबाजार रोखण्यासाठी अचूक नोंदी करण्यासाठी रेशनकार्डला आधार लिकींग मोहिम सुरू करण्यात आली होती. फेब्रुवाारी अखेर रेशनदुकानांमध्ये जाऊन आधार लिकींग करण्यासाठीची मुदत देण्यात आली होती. मात्र निर्धारीत कालावधीत अपेक्षित कार्डधारक लिकींग करू शकले नाही. त्यामुळे त्यामुळे प्रथम १० तारखे पर्यंत तर नंतर आणखी पाच दिवस म्हणजेच १५ तारखेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती.
जिल्ह्यात सध्या १ लाख ३४ हजार अंत्योदय कार्डधारक आहेत. ८ लाख ५० हजार प्राधान्य कुटूुबातील कार्डधारक आहेत. यापैकी जवळपास ९९ टक्के कार्डधारकांचे लिकींग झालेले आहे. जिल्ह्यात ७ लाख ५६ हजार ९८३ रेशनकार्डधारक असून ७ लाख ४९ हजार ६०४ कार्ड धारकांनी आधार लिंक केले आहे. अद्यापही ७ हजार ३७९ कार्डधारकांचे आधार लिंकींग केलेला नाही. त्यांना मार्च महिन्यातील रेशनच्या धान्यापासून मुकावे लागण्याची शक्यता आहे.
आधार लिकींग करतांना अनेकदा वयेावृद्ध तसेच बालकांच्या बोटाचे बायोमेट्रीक व्यवस्थित होत नाही. किंबहूना त्यांना नव्याने आधार अपडेशन करावे लागते. त्यामुळे आधार केंद्र शोधण्याच्या धावपळीपासून ते अपडेट करण्यासाठी देखील बराच वेळ गेला. या काळात अनेकांना वेळेचा मेळ बसविण्याची कसरत करावी लागली. त्यामुळे देखील त्यांचे आधार लिकींंग राहून गेले आहे.
--इन्फो--
पुन्हा मुदतवाढीची मागणी
रेशनवरील धान्य घेणाऱ्यांमध्ये मोलमजुरी तसेच रोजंदारीवर काम करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. त्यांना आधार अपडेट ते लिकींगच्या प्रक्रियेतून जातांना अडचणीींचा सामना करावा लागला. रोजगार बुडवून त्यांना लिकींग करावे लागले. तरीही त्यांचे लिकींग झालेले नाही. त्यांना मुदतवाढ देण्यात यावी अशी मागणी होत आहे.