रेशनकार्डचा तिढा अखेर सुटला
By admin | Published: July 20, 2016 12:31 AM2016-07-20T00:31:09+5:302016-07-20T00:34:56+5:30
सॉफ्टवेअर तयार : वितरण सुरू
नाशिक : गेल्या चार महिन्यांपासून सॉफ्टवेअरमध्येच अडकून पडलेल्या शिधापत्रिका वितरणाचा तिढा अखेर सुटला असून, सेतू केंद्रचालकाने तयार केलेल्या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून मंगळवारपासून नवीन शिधापत्रिका देण्याचे कामकाज सुरू करण्यात आले आहे.
सेतू केंद्राचा ठेकेदार बदलल्यामुळे एक एप्रिलपासून नाशिकमधील शिधापत्रिका वितरण ठप्प झाले होते. नवीन शिधापत्रिका असो वा नाव कमी करणे, नवीन नोंदविणे ही सारी कामे बंद करण्यात आल्याने ऐन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवेशाच्या काळात नागरिकांची प्रचंड गैरसोय झाली. वारंवार यासंदर्भात जिल्हाधिकारी, पुरवठा अधिकाऱ्यांकडे तक्रारी करूनही त्याकडे दुर्लक्षाचीच भूमिका घेण्यात आली तर महाआॅनलाइन या शासकीय सॉफ्टवेअरमध्ये शिधापत्रिकेबाबत नोंद करण्याची सोय नसल्यामुळे नवीन शिधापत्रिका देण्याचे बंद करण्यात आले होते.
दरम्यान, सेतू केंद्रचालकाने शिधापत्रिकेसाठी सॉफ्टवेअर तयार केल्यामुळे मंगळवारपासून नवीन शिधापत्रिकेसाठी अर्ज घेण्यास तसेच नाव कमी करणे, नाव नोंदविणे यासाठीदेखील कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. नवीन शिधापत्रिकेसाठी अर्ज सादर करताना सेतू केंद्राकडून ३३ रुपये, तर प्रत्यक्ष शिधापत्रिका देताना वेगवेगळे दर आकारणी करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)