रेशनकार्ड, शासकीय दाखले देणारा अड्डा उद्ध्वस्त
By Admin | Published: April 11, 2017 01:09 AM2017-04-11T01:09:15+5:302017-04-11T01:09:31+5:30
नाशिक : विविध बनावट शासकीय दाखले देणाऱ्या पंचवटीतील एका दुकानावर सोमवारी शहर धान्य वितरण अधिकारी गणेश राठोड यांच्यासह कर्मचाऱ्यांनी अचानक छापा मारला असता, मोठे घबाड हाती लागले.
पुरवठा खात्याची कारवाई : अनेक बनावट दस्तावेज जप्त
नाशिक : रेशन कार्डासहीत राष्ट्रीयत्व, वय व अधिवास, जन्म-मृत्यूची नोंदणी यांसह विविध बनावट शासकीय दाखले देणाऱ्या पंचवटीतील एका दुकानावर सोमवारी शहर धान्य वितरण अधिकारी गणेश राठोड यांच्यासह कर्मचाऱ्यांनी अचानक छापा मारला असता, मोठे घबाड हाती लागले. अनेक शासकीय अधिकाऱ्यांच्या बनावट स्वाक्षरीचे दाखले तसेच शहर व जिल्ह्यातील शाळा सोडल्याचे कोरे दाखलेही या ठिकाणी सापडले आहेत. पंचवटी महाविद्यालयानजिकच्या श्री जी लॉजिंग जवळील एका सेतू केंद्राच्या बाजूला असलेल्या अग्रवाल असोसिएट्स नामक दुकानात रेशन कार्ड तयार करून मिळत असल्याची कुणकुण धान्य वितरण अधिकारी गणेश राठोड यांना लागली होती. त्यानुसार सोमवारी दुपारी पुरवठा निरीक्षक डेबे, नायब तहसीलदार शेवाळे आदिंच्या पथकाने या दुकानावर अचानक छापा मारला असता, याठिकाणी अनेक महत्त्वाचे दस्तावेज आढळून आले. सदरचे दुकान प्रमोद नार्वेकर याचे असल्याचे व त्याच्याकडे एजंट म्हणून हरिश्चंद्र रामचंद्र अग्रवाल काम करीत होता. हे दोघेही रेशन कार्ड, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला, वय व अधिवास, राष्ट्रीयत्व, शिधापत्रिकेतून नाव वगळणे आदि प्रकारचे बनावट दाखले तयार करीत होते. या ठिकाणी जवळपास शंभर रेशन कार्ड सापडले असून, काही रेशनकार्ड तयार करण्यात आल्याचे व त्यावर महसूल खात्याच्या अनेक अधिकाऱ्यांची बनावट सही, शिक्क्याचा वापर करण्यात आला आहे. त्याचबरोबर जातीचे दहा दाखले, नाशिक महापालिकेकडून देण्यात येणारे जन्म-मृत्यूचे दाखले, नाशिक शहरातील के. जे. मेहता, कोठारी कन्या, पुरुषोत्तम इंग्लिश स्कूल, जनता विद्यालय, गांधीनगर, जु. स. रुंग्टा, चाळीसगाव तालुक्यातील आडगाव येथील जिल्हा परिषद शाळेचे शाळा सोडल्याचे कोरे दाखलेही सापडले आहेत. विविध रकमेचे कोरे स्टॅम्प पेपरही याठिकाणी सापडल्याने झडती सत्र आटोपल्यानंतर पथकाने सर्व दाखले व साहित्य ताब्यात घेऊन पंचवटी पोलीस ठाण्यात धाव घेतली. रात्री उशिरा हरिश्चंद्र अग्रवाल व प्रमोद नार्वेकर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. (प्रतिनिधी)
गुन्ह्याची राज्यव्यापी व्याप्ती
या धाडसत्रात ठाणे जिल्ह्यातील वाडा येथील तहसीलदारांचे रेशन कार्डावरील नाव कमी केल्याचे दाखले तसेच शिधावाटप नियंत्रण समितीच्या ठाणे व मुंबई येथील कार्यालयाचेही नाव कमी केल्याचे दाखले हाती लागल्याने राज्यातील अन्यत्र भागातीलही बनावट दाखले या ठिकाणाहून दिले जात असल्याचा संशय आहे. शिवाय सापडलेले अनेक रेशन कार्डचीदेखील बनावट छपाई करण्यात आली असून, त्याची खात्री करण्यासाठी रेशन कार्डावरील क्रमांक तपासून पाहण्यात आले आहेत.