पहिल्या १०० दिव्यांगांना आठवडाभरात शिधापत्रिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2020 12:34 AM2020-12-05T00:34:12+5:302020-12-05T00:34:39+5:30
दिव्यांग बांधवांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासकीय पातळीवर योजना राबविण्यासाठी जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत तसेच खासदार, आमदार निधी उपलब्ध करून दिव्यांगांच्या योजनेचा लाभ ग्रामीण भागातील शेवटच्या लाभार्थीला मिळवून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. तसेच प्रथम १०० दिव्यांगांना आठवडाभरातच शिधापत्रिका उपलब्ध करून देऊ, असे प्रतिपादन इगतपुरीचे तहसीलदार परमेश्वर कासुळे यांनी केले.
नांदूरवैद्य : दिव्यांग बांधवांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासकीय पातळीवर योजना राबविण्यासाठी जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत तसेच खासदार, आमदार निधी उपलब्ध करून दिव्यांगांच्या योजनेचा लाभ ग्रामीण भागातील शेवटच्या लाभार्थीला मिळवून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. तसेच प्रथम १०० दिव्यांगांना आठवडाभरातच शिधापत्रिका उपलब्ध करून देऊ, असे प्रतिपादन इगतपुरीचे तहसीलदार परमेश्वर कासुळे यांनी केले.
इगतपुरी पंचायत समिती कार्यालयात प्रहार दिव्यांग संघटनेच्या सहभागाने जागतिक दिव्यांग दिन उत्साहात साजरा करण्यात आला, त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी विस्तार अधिकारी परदेशी यांनी शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली. यावर्षी देण्यात येणारा सहा हजार रुपयांचा जिल्हा परिषद दिव्यांग निधी हा वैयक्तिक लाभार्थीच्या बँक खात्यावर जमा केला जाणार असल्याची माहिती गटविकास अधिकारी डॉ. लता गायकवाड यांनी दिली. पंचायत समितीत दिव्यांग मार्गदर्शन केंद्र स्थापन करण्यात आले. तसेच प्रहार संघटनेच्या प्रयत्नातून पन्नास दिव्यांग बांधवांना यूआयडी कार्डचे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी सहायक गटविकास अधिकारी वेंधे, विस्तार अधिकारी परदेशी, पोलीस निरीक्षक अशोक रत्नपारखी, मूकबधिर शाळा मुख्याध्यापक हेमलता जाधव, गोरख बोडके, विठ्ठल लंगडे, राजू नाठे, बाळासाहेब गव्हाणे, सतीश गव्हाणे, अनिल भोपे, प्रहार तालुकाध्यक्ष नितीन गव्हाणे, मंगेश शिंदे, सोपान परदेशी, अशोक ताथेड, बाळासाहेब पलटने, निलेश जाधव, संपत धोंगडे, डॉ, माकणे, शीला कातोरे, मुक्ता गोवर्धने, गणेश खांडरे आदींसह दिव्यांग बांधव उपस्थित होते.
जागतिक दिव्यांग दिनानिमित्त स्थापन केलेल्या दिव्य मार्गदर्शन केंद्राचा लाभ तालुक्यातील ग्रामीण भागातील दिव्यांग बांधवांना होणार असल्याने आजचा दिवस दिव्यांग बांधवांचा आनंदाचा दिवस आहे.
- नितीन गव्हाणे
तालुकाध्यक्ष, प्रहार अपंग क्रांती संघटना, इगतपुरी