सिन्नर तालुक्यात शिधावाटप बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2020 08:53 PM2020-05-14T20:53:03+5:302020-05-14T23:57:38+5:30
सिन्नर : बागलाण तालुक्यातील इंदिरानगर येथील संगीता अशोक आहिरे या महिला रेशन दुकानदारास तेथील सरपंचाने केलेल्या मारहाणीचा सिन्नर तालुका रास्त भाव धान्य दुकानदार संघटनेच्या वतीने बुधवारी (दि.१३) शिधावाटप बंद ठेवत निषेध व्यक्त केला.
सिन्नर : बागलाण तालुक्यातील इंदिरानगर येथील संगीता अशोक आहिरे या महिला रेशन दुकानदारास तेथील सरपंचाने केलेल्या मारहाणीचा सिन्नर तालुका रास्त भाव धान्य दुकानदार संघटनेच्या वतीने बुधवारी (दि.१३) शिधावाटप बंद ठेवत निषेध व्यक्त केला. यासंदर्भात नायब तहसीलदारांना निवेदन देऊन संबंधित सरपंचावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
कोरोनाच्या संकटात शासनाकडून येणारा शिधा लाभार्थींपर्यंत पोहोचविण्याचे काम करणाऱ्या रेशन दुकानदारांना मारहाण करण्याच्या घटना निषेधार्ह असून, बागलाण तालुक्यातील इंदिरानगर येथील संगीता अशोक आहिरे या रेशन दुकानदारास तेथील सरपंचाने मोफतचा तांदूळ का देत नाही, असे म्हणत मारहाण केली.
या घटनेचा निषेध म्हणून सिन्नर तालुका रास्त भाव धान्य दुकानदार संघटनेच्या वतीने एक दिवसाचे शिधावाटप बंद ठेवले. संबंधित सरपंचावर कठोर कारवाई करावी तसेच रेशन दुकानदारांना विमा संरक्षण मिळावे आदी मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या. जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत काळ्या फिती लावून शिधावाटप करणार असल्याचेही निवेदनात म्हटले आहे. संघटनेचे तालुकाध्यक्ष सतीश भुतडा, शहराधक्ष भगवान जाधव यांनी नायब तहसीलदारांना निवेदन दिले.