रेशन, घासलेट दुकानदारांचा संप अटळ
By admin | Published: July 18, 2016 12:08 AM2016-07-18T00:08:58+5:302016-07-18T00:40:53+5:30
आक्रमक : जिल्हास्तरीय बैठकीत निर्णय
नाशिक : सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत कार्यरत असलेल्या रेशन दुकानदार व घासलेट विक्रेत्यांच्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी येत्या एक आॅगस्टपासून राज्यव्यापी बेमुदत संप करण्याचा निर्णय शनिवारी झालेल्या जिल्हास्तरीय बैठकीत घेण्यात आला.
जिल्हा रास्तभाव दुकानदार व किरकोळ केरोसिन परवानाधारक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा कालिका मंदिर सभागृहात घेण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून खासदार हेमंत गोडसे, आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, जिल्हा परिषद अध्यक्ष जयश्री चुंभळे, राज्य सरचिटणीस बाबूराव माने हे होते. यावेळी रेशन दुकानदारांच्या मागण्या मांडण्यात आल्या. त्यात प्रामुख्याने परवानाधारकांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होईल, अशा पद्धतीने कमिशन वाढवून द्यावे अथवा ३५ हजार रुपये मानधन देण्यात यावे, घासलेट विक्रेत्यांवर उपासमारीची वेळ आल्याने त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा प्रश्न सरकारने सोडवावा, शालेय पोषण आहार व शासनाकडे इतर प्रलंबित असलेली देयके सरकारने त्वरित अदा करावीत, दुकानदाराला हमालीसहीत माल दुकानपोहोच मिळावा, लाईट बिल, गाळा भाडे, स्टेशनरी खर्चाची तरतूद करावी आदि मागण्या शासन दरबारी अनेक वर्षांपासून प्रलंबित असूनही त्याकडे वेळोवेळी दुर्लक्ष केले जात असल्याची तक्रार करण्यात आली. शासनाची इतक्या वर्षांपासून सेवा करूनही रेशन दुकानदार व घासलेट विक्रेते दुर्लक्षितच राहिले असून, आज त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली असताना शासन प्रत्येक वेळी नवीन नियम लादून त्यांना खाईत लोटत असल्याची भावना व्यक्त करण्यात आली. या सर्व बाबींची तड लावण्यासाठी येत्या १ आॅगस्टपासून दुकानासाठी माल न उचलण्याचा व विक्री न करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले. या आंदोलनाच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून रविवारपासून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात मेळावे घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. या बैठकीत बोलताना खासदार गोडसे यांनी दुकानदारांच्या प्रश्नांबाबत मुख्यमंत्री व अन्न व नागरी पुरवठामंत्र्यांची भेट घेऊन तोडगा काढू, रेशन दुकानदारांना संपाची वेळ येणार नाही असे सांगितले, तर आमदार फरांदे यांनी येत्या अधिवेशनात आपण या प्रश्नावर सरकारला जाब विचारणार असल्याची ग्वाही दिली. संघटनेचे अध्यक्ष निवृत्ती कापसे यांनी सरकारने आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला तरी संप केला जाणार असल्याचे सांगितले. या बैठकीस जिल्ह्यातील सुमारे सातशे ते आठशे दुकानदार उपस्थित होते. (प्रतिनिधी)