रेशन धान्यामध्ये घोळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2017 01:09 AM2017-10-24T01:09:42+5:302017-10-24T01:09:48+5:30
शासकीय धान्य गुदामातून वजन करून उचललेले धान्य जसेच्या तसे रेशन दुकानदारांकडे पोहोचते करताना ते मोजूनच देण्याचा दंडक शासनाने घातलेला असतानाही वाहतूक ठेकेदाराकडून मात्र त्याला हरताळ फासला जात आहे. शासन मोजून धान्य देत असताना प्रत्यक्षात दुकानदारांना वीस ते पंचवीस किलो धान्याचे कमी वाटप केले जात असून, अशा प्रकारातून शासकीय धान्याचा मोठा घोळ उजेडात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
नाशिक : शासकीय धान्य गुदामातून वजन करून उचललेले धान्य जसेच्या तसे रेशन दुकानदारांकडे पोहोचते करताना ते मोजूनच देण्याचा दंडक शासनाने घातलेला असतानाही वाहतूक ठेकेदाराकडून मात्र त्याला हरताळ फासला जात आहे. शासन मोजून धान्य देत असताना प्रत्यक्षात दुकानदारांना वीस ते पंचवीस किलो धान्याचे कमी वाटप केले जात असून, अशा प्रकारातून शासकीय धान्याचा मोठा घोळ उजेडात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या साºया प्रकाराबाबत पुरवठा खातेही अनभिज्ञ असून, दुकानदारांना कमी धान्य देऊनही ठेकेदार जुमानत नसल्याने तक्रार कोणाकडे करायची? असा प्रश्न पडला आहे. शासनाने शासकीय धान्याची वाहतूक करण्यासाठी ठेकेदाराची नेमणूक केली असून, सदर ठेकेदाराने अन्नधान्य महामंडळ अथवा शासकीय धान्य गुदामातून धान्याची उचल करताना धान्य मोजून घेणे क्रमप्राप्त आहे. ज्याप्रमाणे वाहतुकीसाठी धान्य ताब्यात घेताना एक किलोही धान्य कमी न घेण्याचे वाहतूक ठेकेदाराला बंधनकारक आहे, त्याच प्रमाणे वाहतूक ठेकेदाराने सदरचे धान्य रेशन दुकानदाराला देताना त्याचे वजन करून देणेही तितकेच अपेक्षित आहे. दुकानदारांनीदेखील धान्य ताब्यात घेताना ते मंजूर धान्याच्या प्रमाणात योग्य आहे की नाही याची खात्री करूनच मालाची पोहोच वाहतूक ठेकेदाराला देणे गरजेचे आहे. गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून वाहतूक ठेकेदार धान्य पोहोचविणाºया ठेकेदाराकडून दुकानदारांना धान्य देताना एकूण मंजूर धान्याच्या तुलनेत कमीत कमी पाच ते जास्तीत जास्त ३० किलोपर्यंतचे धान्य कमी दिले जात आहे. यापूर्वी धान्याची वाहतूक करताना गळती होत असल्याचे कारण दिले जात तसेच धान्याची चढ-उतार करणाºया हमालांकडे संशयाने पाहिले जात होते. रेशन दुकानदारांना दरमहा धान्य कमी मिळण्याचे प्रकार घडत होते, तेच टाळण्यासाठी शासनाने वाहतूक ठेकेदाराची नेमणूक केली असली तरी पूर्वीसारखाच धान्य कमी मिळण्याचे प्रमाण सुरू झाल्याची तक्रार रेशन दुकानदार करीत आहेत. या संदर्भात काही दुकानदारांनी ठेकेदाराला विचारणा करण्याचा प्रयत्न केला असता, पुरवठा अधिकाºयांकडे तक्रार करा असा सल्लाच ठेकेदार देत असल्यामुळे धान्य कमी मिळण्यामागे अधिकाºयांचाही काही हात असल्याचा संशय व्यक्त होऊ लागला आहे. काही दुकानदारांना कमी धान्य देऊनही ठेकेदार पुरेसे धान्य मिळाल्याच्या पोहोच पावतीवर स्वाक्षरी करून घेत आहे. काही दुकानदारांना धान्य कमी मिळाल्याचे, तर काहींना पुढच्या महिन्यात धान्य ‘अॅडजेस्ट’ करून देण्याचे आश्वासन दिले जात आहे.
साखरेच्या नावे ठणाणा
ऐन दिवाळी सणात साखर पुरविण्यात अपयशी ठरलेल्या पुरवठा खाते व वाहतूक ठेकेदाराने दिवाळी आटोपल्यावरही अनेक दुकानदारांना साखरेचा पुरवठा केला नसल्याची तक्रार दुकानदार करीत आहेत. विशेष म्हणजे दिवाळीच्या दोन दिवस अगोदर सर्वच धान्य दुकानदारांना साखर देण्याचे पुरवठा खात्याने मान्य केले होते, परंतु प्रत्यक्षात अनेक दुकानदारांपर्यंत साखर पोहोचली नाही, त्यामुळे गोरगरिबांना दिवाळीत खुल्या बाजारातून साखर खरेदी करावी लागली.
शेकडो क्विंटलचा प्रश्न
एका दुकानदाराला पाच ते दहा किलो धान्य दरमहा कमी दिले जात असेल तर संपूर्ण जिल्ह्यातील सुमारे २६०० दुकानांचा हिशेब केल्यास दरमहा शेकडो क्विंटल धान्य ठेकेदाराकडून गायब केले जात असल्याची शक्यता रेशन दुकानदारांनी केलेल्या तक्रारींवरून नाकारता येत नाही. या साºया प्रकारात दोन्ही बाजूंकडून सांभाळून घेण्याचा प्रयत्न होत असल्यामुळे कोणी उघडपणे बोलण्यास तयार होत नाही.