लाभार्थ्यांकडूनच होते रेशनच्या धान्याची विक्री!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2021 04:17 AM2021-09-14T04:17:50+5:302021-09-14T04:17:50+5:30
नाशिक: कार्डधारकांना स्वस्त दरात धान्य मिळावे आणि त्यांच्या दोनवेळच्या जेवणाची भ्रांत मिटावी म्हणून रेशनवर स्वस्त दरात धान्य वितरण केले ...
नाशिक: कार्डधारकांना स्वस्त दरात धान्य मिळावे आणि त्यांच्या दोनवेळच्या जेवणाची भ्रांत मिटावी म्हणून रेशनवर स्वस्त दरात धान्य वितरण केले जाते. सध्या कार्डधारकांना नियमित कार्डावर मिळणारे तसेच केंद्राच्या मोफत धान्य योजनेतूनही धान्य मिळत आहे. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात लाभार्थ्यांना मोठा आधार झाला आहे. मात्र अनेक ठिकाणी लाभार्थीच रेशनचे धान्य पाच ते दहा रुपये किलोने धान्याची विक्री करीत असल्याची बाब लोकमतच्या पाहणीत आढळून आले.
नाशिक शहरातील देवळालीगाव, दिंडोरी येथील बाजारपेठ तसेच मालेगाव या ठिकाणी याबाबतची पडताळणी केली असता. रेशनचे धान्य आपसातील संबंधावर एकमेकांना विक्री केली जात असल्याचे दिसून आले. देवळाली गाव परिसरातील मालधक्का परिसरात बहुतांश हमाल आणि कष्टकऱ्यांची वसाहत आहे. दिंडोरीत आजुबाजूच्या पाड्यावरील गाेरगरीब येतात. तर मालेगाव मध्ये दाट लोकवस्तीत रेशनचे धान्य आपसात विक्री केली जात असल्याचे दिसून आले.
--इन्फो--
नाशिक
नाशिकरोड जवळील मालधक्का परिरसरातील वसाहतीमध्ये हमाल, रोजंदारीवरील कामगारांना रेशनचे धान्य विक्री करणारे आहेत. तांदूळ दहा रुपये तर गहू ८ रुपये दराने विकला जातो. दुकानात धान्य येताच घेणारेही कार्डधारकांना संपर्क साधतात.
दिंडारी
दिंडोरीच्या बाजारपेठेत दर रविवारी काही दुकानांमधून रेशनचे धान्यांची देवाणघेवाण होत असल्याचा संशय आ हे. अगदी पानटपरी पासून ते झेरॉक्सच्या दुकानांमधून तर काही भाजीपाला विक्रेते देखील रेशनचे धान्य आदिवासी बांधवांना पाच ते दहा रुपये किलो दराने गहू, तांदूळ विकतात.
मालेगाव ग्रामीण
मालेगाव ग्रामीण भागात टेहेर, सोयेगाव भागात ठरावीक दुकानांमध्येच रेशनचे धान्य जादा दाराने विक्री केली जात असल्याचे बोलले जाते. लाभार्थी दुकानदारांना गहू, तांदूळ देतात आणि तेथून ते गरजू ग्राहकांना विकले जाते. परंतु रेशनचे धान्य असल्याचे सिद्ध करणे कठीण असते.
--इन्फो--
धान्याचा छडा लावणे कठीण
रेशनचे धान्य लाभार्थीच विक्री करीत असतील तर अशी बाब उघड करणे कठीण असते. हे व्यवहार आपसात तसेच आसपासच्या ओळखीच्या लोकांमध्येच हा व्यवहार होत असावा किंवा असे बोलले जाते. धान्य काही किलो असते त्यामुळे पिशवीतून धान्याचा व्यवहार केला जात असल्याने रेशनचे धान्य म्हणून त्यावर संशय व्यक्त करणे यंत्रणेला कठीण असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.