रेशनमध्ये तांदळाचा खडखडाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2018 12:38 AM2018-05-29T00:38:54+5:302018-05-29T00:38:54+5:30
मे महिन्यात अन्नधान्य महामंडळाकडून नाशिक जिल्ह्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेसाठी तांदळाचा पुरेसा पुरवठा न करण्यात आल्याने रमजान महिन्यात शहरातील रेशन दुकानांमध्ये तांदळाचा खडखडाट निर्माण झाला असून, रेशनचे धान्य खाणाऱ्या गोरगरिबांवर उपासमारीची वेळ आली आहे.
नाशिक : मे महिन्यात अन्नधान्य महामंडळाकडून नाशिक जिल्ह्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेसाठी तांदळाचा पुरेसा पुरवठा न करण्यात आल्याने रमजान महिन्यात शहरातील रेशन दुकानांमध्ये तांदळाचा खडखडाट निर्माण झाला असून, रेशनचे धान्य खाणाऱ्या गोरगरिबांवर उपासमारीची वेळ आली आहे. गेल्या काही दिवसांपासून रेशनच्या तांदळासाठी शिधापत्रिकाधारकांकडून पुरवठा विभागाला तगादा लावण्यात येत असतानाही अद्यापही परिस्थितीत सुधारणा झाली नसल्याचे सांगण्यात आले आहे. नाशिक जिल्ह्यातील सुमारे साडेसात लाख शिधापत्रिका-धारकांसाठी दरमहा सुमारे ३०४४९ क्विंटल तांदूळ शासनाकडून अन्नधान्य महामंडळामार्फत पुरविण्यात येतो. साधारणत: प्रत्येक महिन्याचे धान्य एक महिना अगोदरच अन्नधान्य महामंडळाकडून उचल करून ते रेशन दुकानदारांना वाटपासाठी देण्याची पद्धत अवलंबिण्यात आलेली आहे. परंतु मे महिन्यात मनमाडच्या अन्नधान्य महामंडळाकडे तांदळाचा अल्प पुरवठाच करण्यात आला. १६ मे रोजी फक्त दहा ट्रक तांदूळ भरण्यात आल्यानंतर अन्नधान्य महामंडळाने माल शिल्लक नसल्याचे सांगितले. त्यामुळे जेमतेम रेशन दुकानदारांनाच तांदळाचा पुरवठा करण्यात आला. नाशिक शहरातील २३० रेशन दुकानदारांपैकी निम्म्याहून अधिक दुकानदारांना मे महिन्याच्या अखेरपर्यंत तांदूळ मिळालेला नाही. परिणामी शिधापत्रिकाधारकांच्या रोषाला रेशन दुकानदारांना सामोरे जावे लागले आहे. तांदळासाठी रेशन दुकानदारांनी गेल्या महिन्यातच चलने भरली असून, चालू महिन्याचे धान्य वाटपासाठी अवघे पाच दिवस शिल्लक आहेत. अशातच रमजान महिना सुरू असल्याने मुस्लीम धर्मीयांना उपवास सोडण्यासाठी भात आवश्यक असल्यामुळे त्यांच्याकडून तांदळासाठी तगादा लावला जात आहे. गेल्या दोन दिवसांत शेकडो दुकानदारांनी धान्य वितरण अधिकाºयांकडे तोंडी, लेखी मागणी नोंदविली असून, अद्यापही तांदूळ मिळालेला नसल्याने रेशन दुकानदार व ग्राहकांमध्ये खटके उडू लागले आहेत.
जूनचा तांदूळही नाही
जून महिन्याचा तांदूळ अन्नधान्य महामंडळातून उचलण्यासाठी अंतिम मुदत ३१ मे असून, अद्यापही धान्य वाहतुकदाराला अन्नधान्य महामंडळाकडून तांदूळ मिळालेला नाही. या संदर्भात वाहतूक प्रतिनिधीने १७ जून रोजीच अन्नधान्य महामंडळाला पत्र पाठविले असून, तांदूळ न मिळाल्यास तो व्यपगत (लॅप्स) होण्याची भीती व्यक्त केली आहे.