रेशनदुकानातील जून महिन्याचे वेळापत्रक निश्चित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2020 12:22 AM2020-05-30T00:22:52+5:302020-05-30T00:23:51+5:30
रास्तभाव दुकानात एकाच वेळी नागरिकांची गर्दी होऊ नये, यासाठी जून महिन्याच्या धान्य वितरणाचे वेळापत्रक निश्चित करून धान्य वितरणाचे काम केले जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी रास्तभाव दुकानात गर्दी न करता व सुरक्षित अंतर ठेवून धान्य खरेदी करावे, असे आवाहन धान्य वितरण अधिकारी यांनी केले आहे.
नाशिक : रास्तभाव दुकानात एकाच वेळी नागरिकांची गर्दी होऊ नये, यासाठी जून महिन्याच्या धान्य वितरणाचे वेळापत्रक निश्चित करून धान्य वितरणाचे काम केले जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी रास्तभाव दुकानात गर्दी न करता व सुरक्षित अंतर ठेवून धान्य खरेदी करावे, असे आवाहन धान्य वितरण अधिकारी यांनी केले आहे.
धान्य वितरण अधिकारी यांच्याकडून जून या महिन्याचे धान्य कशाप्रकारे वितरित करणार, याबाबत दुकानदारांना कळविण्यात आले आहे. त्यानुसार केशरी कार्डधारकांना वितरण कालावधी हा १ ते १० जून असा राहणार आहे. अंत्योदय योजनेतील लाभार्थ्यांना वितरण कालावधी हा ११ ते २० जून असा राहणार आहे. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना (अंत्योदय व प्राधान्य कुटुंब)धारकांना मोफत वितरीत वितरण कालावधी हा २१ ते ३० जून असा राहणार आहे. तर केशरी, अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजनेतील राहिलेले कार्डधारकांनी २१ ते ३० जून या कालावधीत रास्तभाव दुकानदारांकडून नियामनुसार धान्य प्राप्त करून घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे एपीएल (केशरी) कार्डधारकांनी त्यांची शिधापत्रिका ज्या रास्तभाव दुकानास जोडण्यात आलेली आहे.
खबरदारी घेण्याच्या सूचना
एपीएल (केशरी) कार्डधारकांना धान्य दिल्यानंतर धान्य दिल्याची पोहोच म्हणून शिधापत्रिकेच्या शेवटच्या पृष्ठावर माहे जूनचे अन्नधान्य दिले असा शिक्का रास्तधान्य दुकानदारांनी मारावा, शिधापत्रिकाधारक यांनी स्वस्त धान्य दुकानातून धान्य घेतेवेळेस एकाच वेळेस गदी करू नये, शिधापत्रिकाधारक यांनी कुटुंबातील एकाच सदस्याला धान्य घेण्यासाठी स्वस्तधान्य दुकानात पाठवावे, शिधापत्रिकाधारक यांनी धान्य घेतेवेळेस चेहऱ्याला मास्क किंवा रुमाल लावून स्वस्तधान्य दुकानात जावे, अशा सूचना करतानाच रास्तभाव दुकानदार यांनी धान्य कमी देणे, जादा रकमेची आकारणी करणे, धान्य खरेदीची पावती न देणे आदी बाबतीत नागरिकांच्या तक्रारी असल्यास, त्यांनी धान्य वितरण अधिकारी यांना कळविण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.