रेशन दुकानदार संघटनेत फूट

By admin | Published: August 5, 2016 01:32 AM2016-08-05T01:32:09+5:302016-08-05T01:32:28+5:30

पूरग्रस्तांना मदत : मोफत धान्य देण्याची मागणी

Ration shopkeeper organization ft | रेशन दुकानदार संघटनेत फूट

रेशन दुकानदार संघटनेत फूट

Next

नाशिक : गोदावरीच्या पुरामुळे नाशिक व निफाड तालुक्यातील शेकडो कुटुंबे बाधीत झाल्याने त्यांना तातडीने रेशन उपलब्ध करून देण्यासाठी संपावर असलेल्या रेशन दुकानदारांना राजी करणाऱ्या पुरवठा अधिकाऱ्यांना अपयश आले आहे. शहरातील काही दुकानदारांनी प्रशासनाला सहकार्य करण्याची भूमिका घेतली, तर काहींनी संपावर ठाम राहत पूरग्रस्तांना मोफत धान्य देत असाल तर वाटप करू अशी भूमिका घेत पुरवठा खात्याला कात्रीत पकडले आहे.
नाशिक शहरातील गोदावरी, नासर्डी, वाघाडी नदीला आलेल्या पुरामुळे शेकडो कुटुंबांवर बेघर होण्याची वेळ आली असून, त्यांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले असले तरी, संसारपयोगी वस्तू पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. अशा परिस्थितीत त्यांना रेशन दुकानाच्या माध्यमातून धान्य उपलब्ध करून देण्याचा पुरवठा विभागाचा प्रयत्न आहे व त्यासाठी त्यांनी संपावर असलेल्या रेशन दुकानदारांना राजी करण्याचा प्रयत्न केला. आमदार देवयानी फरांदे यांच्या मध्यस्थीने दुपारी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडे रेशन दुकानदारांची बैठक घेण्यात आली. त्यात दुकानदारांनी अनेक प्रश्न उपस्थित करून पुरवठा अधिकाऱ्यांना कोंडीत पकडले.
मुळात रेशनवर पूरग्रस्तांना धान्य उपलब्ध करून देण्यासाठी दुकाने उघडल्यास जे पात्र नाहीत, असे पूरग्रस्त धान्य घेण्यासाठी आल्यास काय करायचे असा सवाल त्यांनी केला. सध्या रेशन दुकानदारांचा राज्यव्यापी संप सुरू असून, निव्वळ नाशिक व निफाडसाठी दुकाने उघडल्यास संघटनेत बेबनाव निर्माण होण्याची शक्यताही व्यक्त करण्यात आली. प्रशासन पूरग्रस्तांना मोफत धान्य उपलब्ध करून देणार असेल तर ते वाटप करण्याची जबाबदारी दुकानदार स्वखुशीने घेतील असे सांगितले. प्रशासनाच्या आवाहनाला शहरातील काही रेशन दुकानदारांनी अनुकूलता दर्शविली तर काहींनी संपावर ठाम राहत दुकाने न उघडण्याचा निर्णय घेतला. या बैठकीस दिलीप मोरे, सलीम पटेल, आबा आमले, महेश सदावर्ते, गिरीश मोहिते आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Ration shopkeeper organization ft

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.