रेशन दुकानदार ३ मे रोजी मशीन जमा करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:16 AM2021-04-28T04:16:01+5:302021-04-28T04:16:01+5:30
रेशन दुकानदारांच्या मागण्यांबाबत राज्याचे अन्न व नागरी पुरवठा सचिव विलास पाटील यांनी संघटनेचे अध्यक्ष गजानन बाबर यांना पत्र पाठवून ...
रेशन दुकानदारांच्या मागण्यांबाबत राज्याचे अन्न व नागरी पुरवठा सचिव विलास पाटील यांनी संघटनेचे अध्यक्ष गजानन बाबर यांना पत्र पाठवून कोरोना परिस्थिती पाहाता राज्यावर मोठे संकट आहे. संपूर्ण यंत्रणा त्यात गुंतली आहे. रेशन दुकानदारांचा विमा काढण्याबाबतची फाईल वित्त विभागाकडे आहे. काही मागण्या केंद्र सरकारच्या अखत्यारितील असल्यामुळे तसे अवगत करण्यात आले आहे, त्यामुळे संघटनेने आंदोलन मागे घ्यावे, अशी विनंती केली. तर जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनीदेखील संपाबाबत विचारणा करण्यात येवून धान्य वितरण बंदचा फेरविचार करावा, अशी विनंती केली आहे. १ मे पासून धान्य वितरण बंद करण्याच्या निर्णयाबाबत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांऐवजी आता दुकानदारच निर्णय घेणार आहेत. त्यांच्या मते प्रत्येक गावात शंभर ते दोनशे कोरोनाबाधित रुग्ण असून, त्यांना दाखल करण्यासाठी रुग्णालयात जागा नाही. रेशन दुकानदारांचीही अशीच परिस्थिती असून, अनेक दुकानदार व त्यांचे कुटुंबीय बाधित आहेत. त्यामुळे दुकानदार हादरून गेले आहेत. या सर्व परिस्थितीचा विचार करून केंद्र व राज्य सरकारने दोन पावले मागे घ्यावीत व दुकानदारांच्या मागण्यांचा विचार करावा, अशी मागणी करून ज्यांना दुकान सुरू ठेवायचे असेल त्यांनी ते ठेवावे. उर्वरित दुकानदार जे दुकान सुरू असेल तेथे जावून आपले ई-पॉस मशीन जमा करतील, असा निर्णय घेण्यात आला आहे. शनिवार, १ मे कामगार दिवस व २ रोजी रविवारची सुटी आहे. सोमवार (दि. ३) रोजी दुकानदार आपले मशीन प्रत्येक तालुक्यातील तहसील कार्यलयात जमा करतील, अशी माहिती विभागीय अध्यक्ष गणपत डोळसे पाटील, जिल्हा अध्यक्ष निवृत्ती महाराज कापसे, अशोक बोराडे, पुंडलीक साबळे, माधव गायधनी, दिलीप नवले, मारुती बनसोडे, गोपाल मोरे, बाबूशेठ कासलीवाल, राजेंद्र घोडके, अनिल नळे, संतोष सोनवने यांनी दिली आहे.