रेशन दुकानदारांना बॅँक प्रतिनिधी दर्जा
By admin | Published: January 25, 2017 12:30 AM2017-01-25T00:30:46+5:302017-01-25T00:31:01+5:30
पुरवठा खात्याची बैठक : दुकानदारांचा सत्कार
नाशिक : नोटाबंदीनंतर केंद्र व राज्य सरकारने रोकड विरहित व्यवहार करण्यावर भर दिलेला असताना अन्न व नागरी पुरवठा खात्यानेही सार्वजनिक वितरणप्रणालीत कॅशलेसपद्धती आणण्याचा प्रयत्न चालविला असून, त्यासाठी रेशन दुकानदारांनाच प्रोत्साहन देण्याचा व त्यांच्या माध्यमातून शिधापत्रिकाधारकांना बॅँकेच्या सुविधा देण्यासाठी रेशन दुकानदारांना बॅँक प्रतिनिधीचा दर्जा देण्यात येणार असल्याचे संकेत प्रधान सचिव महेश पाठक यांनी दिले आहेत. मंगळवारी नाशिक विभागातील सर्व पुरवठा अधिकारी, सहायक पुरवठा अधिकाऱ्यांची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात पाठक यांच्या अध्यक्षतेखाली व कक्ष अधिकारी महादेव जोगदंड यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आली. नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील निरंजन देवळे ग्रुप सोसायटी रेशन दुकान क्रमांक तीन व सप्तशृंगी महिला बचत गट, कांचने या दोन रेशन दुकानांमध्ये रोखविरहित अन्नधान्य वितरण सुरू करण्यात आल्याबद्दल पाठक यांनी समाधान व्यक्त केले व ज्या शिधापत्रिकाधारकांनी या योजनेत सहभागी होऊन रोकडविरहित अन्नधान्य खरेदी केले त्यांचा सत्कारही यावेळी करण्यात आला. शासनाने कॅशलेस व्यवहार करण्याचे धोरण स्वीकारलेले असून, त्यासाठी वापरण्यात येणाऱ्या सुविधांचा शिधापत्रिकाधारकांनी लाभ घ्यावा व यात सहभागी व्हावे यासाठी अधिकाधिक प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले. ई सार्वजनिक वितरणप्रणाली लागू करण्याचे कामकाज येत्या काळात तीन टप्प्यांत केले जाणार असून, पहिल्या टप्प्यात नंदुरबार जिल्हा, तर दुसऱ्या टप्प्यात जळगाव व तिसऱ्या टप्प्यात नाशिक, नगर व धुळे या तीन जिल्ह्यांचा समावेश राहणार असल्याचे पाठक यांनी जाहीर केले. नाशिक जिल्ह्यातील प्रत्येक शासकीय गुदामांना सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आल्याबद्दल तसेच दरमहा सात तारखेस अन्नदिन साजरा होत असल्याबद्दल पाठक यांनी समाधान व्यक्त केले. या बैठकीस पुरवठा उपआयुक्त रघुनाथ गावडे, सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी देवगुणे यांच्यासह सर्व अधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)