रेशन दुकानदारांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2017 12:43 AM2017-08-19T00:43:51+5:302017-08-19T00:44:07+5:30

राज्य सरकारने प्रत्येक शिधापत्रिकाधारकाचे आधार क्रमांक जोडल्याशिवाय रेशनवरून शिधा न देण्याचे धोरणाचा पुरस्कार करून त्याची अंमलबजावणीही सुरू केली असली तरी, प्रत्यक्ष व्यवहारात मात्र ठेकेदाराकडून आधार जोडणी चुकीची करण्यात आल्याचा फटका रेशन दुकानदारांना बसू लागला आहे.

Ration shoppers hit | रेशन दुकानदारांना फटका

रेशन दुकानदारांना फटका

Next

नाशिक : राज्य सरकारने प्रत्येक शिधापत्रिकाधारकाचे आधार क्रमांक जोडल्याशिवाय रेशनवरून शिधा न देण्याचे धोरणाचा पुरस्कार करून त्याची अंमलबजावणीही सुरू केली असली तरी, प्रत्यक्ष व्यवहारात मात्र ठेकेदाराकडून आधार जोडणी चुकीची करण्यात आल्याचा फटका रेशन दुकानदारांना बसू लागला आहे. नाशिक जिल्ह्यातील शिधापत्रिकाधारकांची आधार जोडणी ठेकेदाराकडून करून घेताना पुरवठा खात्याने दुकानदारांकडून एकदा नव्हे तर तीन वेळा ‘वर्गणी’ गोळा केली, परंतु ‘इपॉस’ यंत्रात चुकीची माहिती जोडण्यात आल्याने जवळपास ३० ते ४० टक्के शिधापत्रिकाधारक अन्नधान्यापासून वंचित राहिले आहेत.
जुलै महिन्यापासून शासनाने आधार क्रमांक शिधापत्रिका जोडणाºया शिधापत्रिकाधारकांनाच धान्य देण्यास सुरुवात केली असली तरी, त्याची पूर्वतयारी गेल्या वर्षभरापासून पुरवठा खात्याकडून केली जात होती. नाशिक जिल्ह्यातील सर्व रेशन दुकानदारांकडून त्यांच्या दुकानाला जोडलेल्या शिधापत्रिकाधारकांकडून आधारक्रमांक गोळा करण्याच्या सूचनाही त्यासाठी देण्यात आल्या व त्यानुसार दुकानदारांनी शिधापत्रिकाधारकांकडून छापील फॉर्म भरून घेऊन ते पुरवठा खात्याकडे सुपूर्द केले. शिधापत्रिकाधारकांची संपूर्ण माहिती व त्यांचे आधारक्रमांक जोडण्यासाठी पुरवठा खात्याने जगताप नामक ठेकेदाराची नेमणूक केली, त्यावेळी मात्र प्रत्येक दुकानदाराकडून प्रती कार्ड पंधरा रुपये या दराने पैसे गोळा करण्यात आले. विशेष म्हणजे सरकारचे व पर्यायाने पुरवठा खात्याचे हे काम असताना त्याचा भुर्दंड मात्र रेशन दुकानदारांवर टाकण्यात आला. परंतु पैसे मोजूनही ठेकेदार हे काम पूर्ण करू शकला नाही. शहरातील तीन केंद्रांवर रोजंदारी कर्मचाºयांच्या माध्यमातून ठेकेदाराने शिधापत्रिकाधारकांची माहिती संगणकात सदोष माहिती भरली. त्यामुळे अर्धवट काम केल्याने पुरवठा खात्याने ठेकेदार बदलला. सटाणा येथील शिंदे नामक ठेकेदाराला पुन्हा सदरचे काम देण्यात आले, या कामासाठी रेशन दुकानदारांकडून पुन्हा वर्गणी गोळा करण्यात आली व त्यानेही ‘येरे माझ्या मागल्या’प्रमाणे काम केल्याने त्याच्याकडून काम काढून घेण्यात आले. तिसºयांदा पुन्हा नव्याने ठेकेदार नेमण्यात आला. व त्याच्यावर आधार लिंक करण्याचे काम सोपविण्यात आल्यावर त्यांनीही तीच पुनरावृत्ती केल्याचे आता प्रत्यक्ष वापराअंती दुकानदारांच्या निदर्शनास आले. सध्या रेशन दुकानदार शिधावाटप करण्यासाठी ‘इपॉस’ यंत्राचा वापर करीत असून, या यंत्रामध्ये पुरवठा खात्याने ठेकेदाराकडून संकलित करण्यात आलेली माहिती भरण्यात आली आहे. परंतु धान्य घेण्यास येणाºया शिधापत्रिकाधारकांच्या हाताचा अंगठा वा आधारक्रमांक एकमेकांशी जुळत नसल्याने दुकानदार व शिधापत्रिकाधारक दोन्हीही अडचणीत आले आहेत.

Web Title: Ration shoppers hit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.