नाशिक जिल्ह्यात रेशनची आधार जोडणी निम्म्यावरच !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2018 05:22 PM2018-02-10T17:22:57+5:302018-02-10T17:25:13+5:30
शिधापत्रिकाधारकांचे आधार क्रमांक जोडून बायोमॅट्रिक पद्धतीने पॉस यंत्राद्वारे रेशनमधून धान्याचे वाटप करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राज्य सरकारने काही वर्षांपासून हाती घेतला असून, त्यासाठी अगोदर सर्व नागरिकांना आधारकार्ड काढण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले व नंतर शिधापत्रिकेवर नाव असलेल्या प्रत्येकाचे आधार क्रमांक गोळा करून ते शिधापत्रिकेशी जोडण्याचे
नाशिक : राज्य सरकारने सार्वजनिक वितरण प्रणालींतर्गत आधार जोडणी झालेल्या शिधापत्रिकाधारकांनाच मार्च महिन्यांपासून रेशनवर धान्य देण्याचा निर्णय घेतल्याने फेब्रुवारीअखेर आधार सिडिंगचे काम करण्याचे मोठे आव्हान पुरवठा विभागासमोर उभे ठाकले असून, नाशिक जिल्ह्यातील साडेसात लाख पात्र शिधापत्रिकाधारकांची संख्या लक्षात घेता आजपावेतो जेमतेम ५० टक्केच काम झाल्याने मार्चपासून धान्य वितरणात अडचणी निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
शिधापत्रिकाधारकांचे आधार क्रमांक जोडून बायोमॅट्रिक पद्धतीने पॉस यंत्राद्वारे रेशनमधून धान्याचे वाटप करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राज्य सरकारने काही वर्षांपासून हाती घेतला असून, त्यासाठी अगोदर सर्व नागरिकांना आधारकार्ड काढण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले व नंतर शिधापत्रिकेवर नाव असलेल्या प्रत्येकाचे आधार क्रमांक गोळा करून ते शिधापत्रिकेशी जोडण्याचे काम हाती घेण्यात आले. गेल्या चार वर्षांपासून सदरचे काम सुरू असून, त्यात शासनाने वेळोवेळी बदललेले निकष, रेशन दुकानदारांचे असहकार्य, आधार सिडिंग करणा-या खासगी ठेकेदाराची मनमानीमुळे सदरचे काम अतिशय मंदगतीने सुरू आहे. आधार सिडिंग करणारा ठेकेदार दरवेळी बदलत गेल्यामुळे नाशिक जिल्ह्यातील शिधापत्रिकाधारकांकडून चार ते पाच वेळा आधार क्रमांक गोळा करण्यात आले आहेत. तरीदेखील अजूनही काम पूर्ण झालेले नाही. अशा परिस्थितीत रेशन दुकानदारांच्या काळाबाजाराला आळा बसण्यासाठी मार्च महिन्यापासून अन्न व पुरवठा खात्याने आधार सिडिंग झालेल्यांनाच रेशनवरून धान्य देण्याचे ठरविले आहे.
नाशिक जिल्ह्यात साडेसात लाख शिधापत्रिकाधारक असून, त्यातील जेमतेम ५० टक्के शिधापत्रिकाधारकांच्या आधारची जोडणी झाली असून, राज्यात हेच प्रमाण चौदाव्या क्रमांकावर आहे. त्यामुळे येत्या महिनाभरात आधार जोडणी पूर्ण करण्याचे आव्हान पुरवठा खात्यापुढे उभे आहे. मात्र शासनाने त्यावरही उतारा शोधला असून, ज्यांच्या आधारची जोडणी अद्याप झालेली नाही अशांसाठी ओळख पटवून रेशन दुकानदाराकडे आपली जोडणी करून घेता येणार आहे. ग्रामीण भागात गावातील सरपंच, पोलीसपाटील, ग्रामसेवक, तलाठी यांची नावे आधार क्रमांक, मोबाइल क्रमांक पॉसद्वारे सिडिंग करून ज्यांच्याकडे आधार नाही अशांना नॉमिनी करून धान्य वाटप करण्याची मुभा शासनाने दिली आहे. ज्यांच्याकडे आधार क्रमांक असतील, परंतु त्यांची जोडणी झालेली नसेल अशांनी ई-पॉसद्वारे केवायसी सुविधा वापरून त्याची जोडणी करण्याची सोयही करून देण्यात आली आहे.