लस घेतली तरच मिळणार रेशन, सातबारा उतारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2021 06:47 PM2021-11-03T18:47:38+5:302021-11-03T18:48:35+5:30
लोहोणेर : कोरोनाची प्रतिबंधक लस घ्या, नाही तर शासनामार्फत मिळणारे रेशनचे धान्य, सातबारा उतारा, ग्रामपंचायतीकडून मिळणारे कोणतेही शासकीय दाखले तसेच कुठल्याही योजनांचे लाभ मिळणार नाहीत, असा अनोखा निर्णय देवळा तालुक्यातील सावकी ग्रामपंचायतीने घेतल्याने लसीकरणास टाळाटाळ करणाऱ्या नागरिकांना चांगलाच चाप बसणार असल्याने ग्रामपंचायतीने घेतलेल्या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

राज्यात तिसऱ्या लाटेची शक्यता सर्वच तज्ज्ञांनी वर्तविली आहे. या संभाव्य तिसऱ्या कोरोनाच्या लाटेला रोखण्यासाठी केंद्र व राज्य शासन कसोशीने प्रयत्न करत आहे. जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या निर्देशानुसार देशातील नागरिकांचे संपूर्ण लसीकरण करणे गरजेचे असल्याने त्यासाठी विविध उपाययोजनासुद्धा राबवल्या जात आहेत. आरोग्य विभागाच्या सर्व यंत्रणा, गावोगावी-घरोघरी जाऊन शिबिराद्वारे नागरिकांसाठी लसीकरण मोहीम राबवत आहे. मात्र असे असले तरी, प्रशासनाच्या लसीकरण मोहिमेकडे अनेक नागरिक कानाडोळा करत लसीकरण करून घेत नसल्याची बाब पुढे आली आहे. यावर उपाय म्हणून देवळा तालुक्यातील सावकी ग्रामपंचायतीने भन्नाट युक्ती करायचे ठरवले आहे.
कोरोना प्रतिबंधक लसीचा अद्यापही पहिला डोस तसेच पहिला डोस घेऊन दुसऱ्या डोससाठी ठरवून दिलेला कालावधी उलटूनही दुसरा डोस न घेतलेल्या नागरिकांना स्वस्त धान्य दुकानातून वितरित करण्यात येणारे धान्य, तलाठ्यांकडून देण्यात येणारा सातबारा उतारा तसेच ग्रामपंचायतीचे कोणतेही शासकीय दाखले, कागदपत्रे आणि योजनांचे लाभ मिळणार नसल्याचा निर्णय नुकताच सावकी ग्रामपंचायतीच्या वतीने घेण्यात आला आहे. ग्रामपंचायतीचे प्रशासक जे. एस. भामरे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या ग्रामसभेत सर्वानुमते हा ठराव पारित करण्यात आला असून, यामुळे लसीकरणाचा वेग वाढण्यास मदत होणार आहे. यावेळी ग्रामसेवक वैशाली पवार, तलाठी कल्याणी कोळी, पोलीसपाटील अश्विनी बच्छाव, आरोग्यसेवक दिनेश शेवाळे आदींसह मोठ्या संख्येने सावकी गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.